नीलेश शहाकार/बुलडाणा : राज्यातील शहरीभागात वाढलेली कबुतरांची संख्या अस्थमाला कारणीभूत असल्याचे मुंबई येथील केईएम रूग्णालयातील उरो औषध व पर्यावरण संशोधन केंद्राने नोव्हेंबर २0१४ मध्ये केलेल्या प्रयोगाने उघड झाले आहे. यामुळे कबुतरांची वाढती संख्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. २0१३ च्या पशुगणनेनुसार राज्यात जवळपास १ लाख ९0 हजार कबुतरांची संख्या आहे. घराच्या खिडक्या, घराचे माळे, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक इमारती, देवस्थाने आदी ठिकाणी कबुतरं नेहमी वास्तव्य करतात. वाढत्या शहरीकरणामुळे हवामानात होणारे बदल, सातत्याने होणारी बांधकामे रस्त्याच्या कामांमुळे हवेतील धुळीचे वाढते प्रमाण आणि अनुवंशिकता यामुळे नागरिकांना आज श्वसनाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता कबुतरांच्या संख्येची भर पडली आहे. कबुतरांबाबत झालेल्या प्रयोगानंतर काही निष्कर्ष आता समोर आले आहेत. कबुतरांच्या विष्ठेमधून पसरणार्या विषाणूंमुळे शहरातील अस्थमा रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दरम्यान खामगाव येथील पक्षीमित्र संजय गुरव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कबुतरांमुळे अस्थमा होतो याबाबत अद्यापही कुठलाही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले. शिवाय मुंबई येथे कबुतरांबाबत झालेला प्रयोग मुंबई शहरापुरताच सिमीत होता. त्यामुळे सर्वत्र वावरणार्या कबुतरांमुळे अस्थमा होतोच, असे म्हणता येणार नाही. अस्थमासाठी वाढते प्रदुषण जवाबदार असल्याचे ते म्हणाले.
कबुतरांची वाढती संख्या अस्थमाला कारणीभूत !
By admin | Updated: May 5, 2015 00:06 IST