आकोट : विधवा व परित्यक्ता महिलांना मिळणारा बीपीएल योजनेअंतर्गतचा धान्य पुरवठा अचानक बंद झाल्याने शेकडो महिलांनी स्थानिक तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन आपल्या मागणीचे निवेदन अधिकार्यांना सादर केले. गत महिन्यापर्यंत शहरातील विधवा व परित्यक्ता महिलांना बीपीएल तात्पुरत्या योजनेद्वारे बीपीएल दराने धान्य पुरवठा होत होता. परंतु हा पुरवठा अचानक बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक विधवा तथा परित्यक्ता महिला अडचणीत सापडल्या. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने सामाजिक कार्यकर्ता दिलीप बोचे यांनी या महिलांवरील अन्यायाला वाचा फोडली. त्यांनी शेकडो विधवा, परित्यक्ता महिलांचा मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर निदर्शने केलीत. त्यानंतर तहसीदार प्रदीप पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शासनाचा कोणताही आदेश नसताना या महिलांचा धान्य पुरवठा कोणत्या आधारावर बंद केला, याबाबत पृच्छा करण्यात आली. यासोबतच या सर्व महिलांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करून घेऊन त्यांना धान्य पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात हा प्रश्न निकाली न काढल्या गेल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिलीप बोचे यांनी दिला आहे.
शेकडो महिलांची धडकल्या तहसीलवर
By admin | Updated: August 4, 2014 20:19 IST