संजय खांडेकर।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एकेकाळी राजा - महाराजांची तसेच घोडे शौकीनांची ‘शान की सवारी’ असलेली घोडेस्वारी महागणार असून घोड्यालाही आता १८ टक्के जीएसटीचे ओझे वाहावे लागणार आहे.पशु संवर्धनाच्या श्रेणीतून घोड्याला वगळून घोडे खरेदी व्यवहारावर १८ टक्के जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लादल्याने, महाराष्ट्रातील घोडा बाजारात मंदीचे सावट आले आहे. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम जिल्ह्यापासून तर ग्रामीण भागात जाणवत आहे. पूर्वीसारखी घोडेस्वारी आज नसली तरी घोडेस्वारीचे शौकीन आजही आहेत. घोड्यांच्या शर्यती अजूनही मोठ्या शहरांमध्ये सातत्याने घेतल्या जात असून, त्यावर कोट्यवधीची उलाढाल होते. महाराष्ट्रातील विविध जातींच्या घोड्यांना देशभरातून मागणी आहे. घोड्यांच्या व्यवहारावर जीएसटी परिषदेने १८ टक्के जीएसटी लादला आहे. जुलै महिन्यापासून लागू झालेल्या जीएसटीमुळे राज्यातील घोडे बाजारावर फार मोठा परिणाम झाला असून, घोड्यांच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. महागडे घोडे व त्यांच्यावरील सांभाळाचा खर्च वाढल्याने अप्रत्यक्षपणे वरात, लग्न समारंभ आणि मिरवणुकीत भाड्याने मिळणारे घोडेही महागणार आहेत. परिणामी व्यवसायासाठी घोडे खरेदी करणाºयांची संख्या रोडावत आहे. राज्यातील घोडा खरेदी -विक्रीची बाजारपेठ असलेल्या अकलूज, सारंगखेडा, माळेगाव घोडे आणि शिरपूर चोपडा या चारही ठिकाणच्या घोडेबाजारात मंदीचे सावट आहे.-------------------------------------------------विविध जातींच्या घोड्यांमध्ये पंजाबच्या घोड्यांना अधिक मागणी असते. पूर्वी राज्याच्या आणि देशाच्या सीमा ओलांडून दोन महिन्याआधी अनेक जातींचे घोडे राज्यातील बाजारात येत असत; पण १८ टक्के जीएसटी लागल्यापासून वेगवेगळ््या प्रदेशातील घोडे येणे कमी झाले आहे.- गुड्डू पठाण, घोडेवाले, अकोला