विवेक चांदूरकर / अकोलाजिल्ह्यातील बाश्रीटाकळी येथे खोलेश्वर, पिंजर येथे कपिलेश्वर, सिंदखेड येथे मोरेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. २७ जुलैपासून श्रावण महिना सुरू झाला असून, या हेमाडपंथी मंदिरांमध्ये यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दर सोमवारी धार्मिक कार्यक्रम पार पडतात, तर भाविकांच्या श्रद्धेला उधाण आले असते. संपूर्ण महिनाभर या मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम पार पडतात. बाश्रीटाकळी येथे चार ते पाच गोपुरं असलेले महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराला खोलेश्वर म्हणून संबोधले जाते. मुख्य मंदिरात तीन ते चार उपमंदिरे आहेत. मुख्य मंदिरातील गाभार्यांमध्ये शिवलिंग आहेत तर उपमंदिरांमध्ये गणेश व कालंका देवीच्या मूर्ती आहेत. मंदिर तीन मजली आहे. या मंदिरात वर्षातून तीन वेळा यात्रेचे आयोजन करण्यात येते. अनेक वर्षांपासून येथे श्रावण सोमवारी यात्रा भरते. श्रावणात महिनाभर परिसरातील नागरिकांची वर्दळ असते. या मंदिरातील महादेवाची पिंड नदीच्या पात्रात वीस फूटखोल जमिनीत असून, या ठिकाणी पाण्याचा झरा आहे. या झर्याला बाराही महिने पाणी राहत असून, महादेवाची पिंड पाण्याखाली असते. गाभार्यासमोरच नंदी बसलेला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर गणेशाचे उपमंदिर आहे. तसेच डाव्या बाजूला कालंका देवीचे मंदिर आहे. या मंदिरात चार ते पाच फुटांची कालंका देवीची मूर्ती आहे. मंदिर तीन मजली असल्यामुळे वरच्या मजल्यावरही जाता येते. खांबांवर मंदिराचा भार आपल्या खांद्यावर उचलून असलेले यक्ष आहेत. मंदिर नागवंशीयांनी बांधल्यामुळे नागाचे चिन्ह ठिकठिकाणी आढळते. या मंदिराची बांधकाम शैलीच या मंदिराची ओळख आहे. या मंदिराकडे शासनाचे दुर्लक्ष असले तरी भाविक भक्त मंदिरांची चांगली देखरेख करतात. बांधकाम मुळातच टणक असल्यामुळे मंदिराची अवस्था चांगली आहे.
भाविकांचे श्रद्धास्थान ‘शिवा’ची हेमाडपंथी मंदिंरे
By admin | Updated: July 28, 2014 01:54 IST