विवेक चांदूरकर/ अकोलाराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव राष्ट्रीय थोर पुरुषांच्या यादीत नाही, हे आश्चर्यकारक आहे. संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वेचणार्या तुकडोजी महाराजांना थोर पुरुषांच्या यादीतून डावलणे, हे शासनाचे विस्मरण आहे की काय, हेच कळत नसल्याची खंत राष्ट्रसंतांच्या विचारांच्या प्रचार-प्रसाराचे कार्य करणारे आचार्य हरिभाऊ वेरूळकर यांनी व्यक्त केली. या मुद्यावर गुरूदेव भक्तांनी सुरू केलेली लोकचळवळ आणखी व्यापक करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.राष्ट्रसंतांचे नाव राष्ट्रीय थोर पुरुषांच्या यादीत शासनाने समाविष्ट केले नसल्याचे वृत्तह्यलोकमतह्णने प्रकाशित केले होते. गुरूदेव भक्तांमध्ये शासनाच्या या धोरणामुळे रोष व्यक्त व्हायला लागला. गुरूदेव भक्तांनी ९ ऑगस्टपासून संपूर्ण विदर्भात क्रांतीज्योत यात्रा काढली आहे. या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. अकोल्यात समाजसेवक गणेश पोटे व चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. या उपोषण मंडपास भेट देण्यासाठी आचार्य वेरूळकर अकोल्यात आले असता, त्यांनी लोकमतशी केलेली खास बातचित.शासनाने राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत का समाविष्ट केले नाही? उत्तर - तुकडोजी महाराज यांचे कार्य समाजासाठी प्रेरक आहे. शासनाने थोर पुरुषांची यादी बनविताना कोणते निकष लावले, हे बघणे गरजेचे आहे. यादीमध्ये कुणाकुणाचे नाव आहे व राष्ट्रसंताचेच का नाही, याचा शोध घ्यायला हवा. या मुद्यावरून सुरू झालेल्या लोकचळवळीबद्दल काय मत आहे?उत्तर - राज्य शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावावरून राज्यभर अनेक योजना सुरू केल्या. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव दिले, कारण तुकडोजी महाराज थोर पुरूष आहेत म्हणूनच. चिंतामणराव देशमुख यांनी पंडित नेहरू पंतप्रधान असताना ग्रामगीतेचे १४ भाषांमध्ये भाषांतर करून त्यांनी सांगितलेल्या ग्राम उद्धाराची संकल्पना गावागावात राबविली तर देशाचा विकास होऊ शकेल, असे लोकसभेत सांगितले होते. कारण की तुकडोजी महाराज हे थोर पुरूष आहे म्हणूनच. मग त्यांचे नाव राष्ट्रीय थोर पुरुषांच्या यादीत का नाही? गुरूदेव भक्तांनी या मुद्यावर घेतलेली लोकचळवळीची भूमिका निश्चितच योग्य आहे. ही लोकचळवळ आणखी व्यापक व्हायला हवी. शासनाची भूमिका काय असायला हवी?उत्तर - राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत का समाविष्ट केले नाही, ही शासनाची चूक आहे. शासनाने आता ही चूक सुधारून राष्ट्रसंतांचे नाव यादीत त्वरित समाविष्ट करायला हवे. यापुढे आपली भूमिका काय असणार आहे? उत्तर - शासनाने राष्ट्रसंतांचे नाव यादीत समाविष्ट केले नाही तर गावागावांतील गुरुदेव सेवा मंडळं विविध प्रकारची आंदोलनं करणार आहेत. हजारो लोक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आंदोलनाने शासनापुढे समस्या निर्माण होऊ शकते. या यादीतील अन्य नावांवर आक्षेप आहे का? उत्तर - अन्य नावांवर मला आक्षेप नाही. राष्ट्रसंतांचे नाव यादीत समाविष्ट करावे, एवढीच अपेक्षा आहे.
गुरुदेव भक्तांची लोकचळवळ आणखी व्यापक व्हावी!
By admin | Updated: August 14, 2014 02:02 IST