आकोट : तालुक्यातील वडाळी सटवाई येथील एकाच कुटुंबातील चार चिमुकले तथा त्यांच्या मातेला अन्नातून विषबाधा झाल्याने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. वडाळी सटवाई येथील कुटुंब पंचगव्हाण येथील नातेवाईकाच्या घरी विवाहासाठी गेले. २९ मे रोजी विवाह पार पडला. दुसरे दिवशी दुपारचे जेवण आटोपून हे कुटुंब हिवरखेड येथे नातेवाईकांकडे गेले. तेथे पोहोचताच दुपारी चार लहान मुले व त्यांची माता यांना उलट्या व शौचाचा त्रास होऊ लागला. म्हणून रिजवान अली (११), इकरामन (४), फसान अली (८), फरहान अली (७) तथा त्यांची माता शाहीन परवीन यांना उपचारार्थ आकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रीचे शिळे अन्न खाल्ल्याने त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. सध्याचे वातावरण अतिशय उष्ण असल्याने रात्रीचे अन्न न खाता ताजे अन्न खाण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकार्यांनी दिला.
मातेसह चार चिमुकल्यांना विषबाधा
By admin | Updated: May 31, 2014 21:59 IST