सिंदखेडराजा : स्थानिक दिवाणी व फौजदारी न्यायालयात सुरु असलेल्या एका प्रकरणात जामीन मिळविण्यासाठी सादर करण्यात आलेले ऐपत प्रमाणपत्र बनावट असल्याने, असे प्रमाणपत्र देणार्या ७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन लाखाचे ऐपत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार नायब तहसिलदारांकडे तर २ ते ८ लाखांचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार तहसिलदारांकडे असून, ८ ते ४0 लाखाचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना असतात. येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये सुरु असलेल्या ६ प्रकरणात जी २ लाखाची ऐपत प्रमाणपत्र सादर करण्यात आली ती प्रमाणपत्र न्यायालयाने तहसिलमध्ये नायब तहसिलदार गणेश माळी यांच्याकडे शहानिशा करण्यासाठी पाठविली. सदर प्रमाणपत्रावर नायब तहसिलदार संतोष काकडे यांची स्वाक्षरी होती. वास्तविक नायब तहसिलदार काकडे यांची २४ फेब्रुवारी २0१४ रोजी बदली झाली. सदर ऐपत प्रमाणपत्रावर काकडे यांच्या स्वाक्षर्या २५ मे रोजीच्या ऐपत प्रमाणपत्रावर दाखवून प्रकरण सादर केल्याचे उघड झाले. बनावट सह्या करुन बनावट शिक्के मारुन असे ऐपत प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी आरोपी नाथा कान्हू साबळे, नारायण साहेबराव काकडे, भानुदास कान्हु साबळे रा.वडाळी, प्रल्हाद रुपा चव्हाण आडगावराजा, सुरेश आसाराम खाटीकमारे, अशोक गोविंदा मोरे, रमेश तिडके सिंदखेडराजा यांचेवर स्थानिक पोलीस स्टेशनला कलम १७७, १८२, १९३, १९६, ११७, ११८, ४६५, ४६६, ४६८, ४७१, ४७२, ४७३ भादंविनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास पोहेकॉ रमेश मिसाळकर हे करीत आहेत. ** बुलडाणा : डी.एड.असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करुन संस्थाध्यक्ष व सचिव यांच्या सहमतीने नोकरी मिळविणार्या शिक्षिकेसह ३ लोकांवर काल २१ जुलै रोजी रात्री बुलडाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा प्रकार नॅशनल शिक्षण व बहुउद्देशिय संस्था, बुलडाणा मार्फत सुरु असलेल्या नॅशनल व उदरु उच्च प्राथमिक शाळा येथे उघडकीस आला आहे. प्राप्त माहितीनुसार, नाजीया परवीन मिर्जा युनूस बेग हीने उर्दू माध्यमातून डी.एड. झाले, असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करुन शहरातील मिर्जा नगरातील नॅशन उर्दू हायस्कुल मध्ये शिक्षिका म्हणून नोकरी मिळविली. या प्रकारात संस्थेचे अध्यक्ष मिर्जा युनुस बेग तसेच सचिव मिर्जा इरफान बेग यांनी २00५ मध्ये मदत करुन नाजीया फिरदौस हीला शिक्षिका पदावर नोकरी देत शासनाची दिशाभुल केली. विशेष म्हणजे या प्रकरणी अँड.मं.जावेद अ.खलील शेख रा.बुलडाणा यांनी २७ एप्रिल २0१४ रोजी शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग, अमरावती यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान प्रकार उघड झाल्यामुळे बुलडाणा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर भाऊराव तेजनकर यांच्या तक्रारनुसार आरोपी शिक्षिका नाजीया फिरदौस मिर्जा युसुस बेग, संस्थाध्यक्ष मिर्जा युनुस बेग आणि संस्था सचिव मिर्जा इरफान मिर्जा युनुस बेग, सर्व राहणार बुलडाणा यांच्या विरुद्ध शहर पोलिसांनी भांदविच्या कलम ४१९,४२0, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अधिक ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सद्या तिन्ही आरोपी फरार असल्याची माहिती आहे.
बनावट प्रमाणपत्राचा फटका
By admin | Updated: July 23, 2014 00:30 IST