अकोला : अकोट.. शेगाव मार्गावरील दापुरा फाटा ते मनब्दापर्यंत उखडलेला रस्ता तसेच उमा व काटेपूर्णा सिंचन प्रकल्पांतर्गत कॅनाॅलच्या कामांची चाैकशी कररून अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत दिले. जिल्ह्यातील विविध मुद्द्यांवर ‘डीपीसी’ची सभा चांगलीच गाजली.
अकोट ते शेगाव मार्गावरील दापुरा फाटा ते मनब्दापर्यंत रस्त्याचे काम करण्यात आले; मात्र हा रस्ता उखडला असून, ठिकठिकाणी खड्डे पडल्याने, या भागातील नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी सभेत उपस्थित केला. त्यानुषंगाने यासंदर्भात सात दिवसांत चाैकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. तसेच आमदार व जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या पत्राला सात दिवसांत उत्तर दिले पाहिजे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी या सभेत दिल्या. उमा सिंचन प्रकल्पांतर्गत सिंचन विभागाने सिंचनासाठी दीड महिना उशिराने पाणी सोडले. त्यामुळे गहू पिकाच्या उत्पादनात घट होणार असून, पाणी सोडल्यानंतर कॅनाॅल दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आल्याचा मुद्दा आमदार हरिष पिंपळे यांनी सभेत उपस्थित केला. त्यानुषंगाने उमा व काटेपूर्णा धरणात पाणी उपलब्ध असताना मागणीच्या तुलनेत शेतकऱ्यांना पाणी का मिळाले नाही, कॅनाॅल दुरुस्तीची कामे विलंबाने का सुरू करण्यात आली, यासंदर्भात चाैकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी सभेत दिले. निमकर्दा ते मोरगाव भाकरे या रस्ता कामासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता; मात्र हा रस्ता बदलून दुसऱ्याच रस्त्याचे काम करण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात कार्यवाही करून, निमकर्दा ते मोरगाव भाकरे रस्त्याचे काम करण्याची मागणी माजी महापाैर विजय अग्रवाल यांनी सभेत केली तसेच शिलोडा येथील महानगरपालिकेच्या ‘एसटीपी प्लांट’करिता रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही विजय अग्रवाल यांनी सभेत केली.
पशुधन विकास मंडळाचे कार्यालय
हलविण्याचे षडयंत्र हाणून पाडा!
अकोल्यातील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या इमारत बांधकामासाठी निधी मंजूर असून, प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे; मात्र निधी अद्याप खर्च करण्यात आला नसून, इमारतीचे बांधकाम अद्याप सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे अकोल्यातील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे कार्यालय पुणे येथे हलविण्याचे षडयंत्र हाणून पाडण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी सभेत केली. त्यानुषंगाने पशुधन विकास मंडळाच्या इमारतीच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले.
माता नगरातील घरकुलांचा
प्रस्ताव सादर करा!
अकोला शहरातील माता नगरात लागलेल्या आगीत झोपड्या खाक झाल्या होत्या. त्यामुळे माता नगरातील झोपडपट्टीवासीयांना घरकुल उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार गाेवर्धन शर्मा यांनी सभेत केली. त्यानुषंगाने यासंदर्भात शासन निर्णयानुसार कार्यवाही करून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले.