अकोला : पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब मूलस्थानी जिरवावा लागणार असून, वृक्ष लागवड व संवर्धन करावे लागणार आहे. यामुळे प्रचंड प्रमाणात होणारा पर्यावरणाचा र्हास थांबवण्यास मदत होणार आहे. त्यासाठी या पर्यावरण दिनापासून जल, माती, वृक्ष लागवड व संवर्धनावर प्रत्येकाने भर देण्याची गरज आहे. पर्यावरणाचे म्हणजेच पंचमहाभूताचे संरक्षण होय, यामुळे झाडा-झुडपाचे खर्या अर्थाने संरक्षण होते. यासाठी पावसाचे पाणी व वाहून जाणार्या मातीच्या व्यवस्थापनासंबंधी प्रत्येकाला काळजी घ्यावी लागणार आहे. आताच्या घडीला भूपृष्ठावर मातीचा भाग आहे. त्यावर एक लाख घन किलोमीटर पाऊस पडतो. यातील ४२ हजार घन किलोमीटर पाणी सरळ समुद्रात वाहून जाते. हे पाणी उताराच्या दिशेने वाहतांना जमीन, शेतीतील माती मोठ्या प्रमाणात वाहून नेते, मोठ्या प्रमाणात मातीची धूप होते. यामुळे तलावात गाळ साचतो. नदी, नाले उथळ होतात. पर्यावरण परिस्थितीमध्ये तसेच जमिनीच्या भरावामध्ये मोेठे बदल होतात. परिणामी जंगल, वने, वनस्पती नष्ट होऊ लागतात. मोठ्या प्रमाणात जमीन बोडखी होते. यामुळे पर्यावरणाचा र्हास होतो. यासाठी पडणारा पाऊस शिवारातल्या शिवारात जिरवावा लागतो. त्यामुळे अनेक प्रश्न सोपे होतात. पावसाच्या पाण्याचे यथोचित संवर्धन होते. आजमितीस भुपृष्ठावरील पाणी बघितल्यास हे पाणी नद्यापेक्षा १० पटीने जास्त सरोवर व तलावात आहे. म्हणूनच यापुढे तलाव व सरोवरांचे संवर्धनदेखील करावे लागणार आहे. यासाठी पावसासोबत वाहून येणारा गाळ या तलाव, सरोवरात जाता कामा नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. पर्यावरण संतुलनासाठी पाणी हे मूळ आहे. म्हणजेच पाण्याचेच महत्त्व अधिक आहे.
**साधे उपाय
नदी खोर्यात पाणी तर अडवावेच शिवाय प्रत्येकाने यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतींनी गावातील पाणी गावातच अडवून जिरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक घराचं पाणी अडवून जिरवावे लागेल. शेतीत उपाययोजना करू न जलसंवर्धन करणे आता काळाची गरज आहे. त्यासाठी शक्य तेवढे उपाय एकत्रितपणे करण्याचा कार्यक्रम आखावा लागणार आहे.
**कारखान्यामुळे प्रदूषण
कारखान्यातून निघणारे वेगवेगळे वायू, धुरामुळे प्रदूषण वाढले आहे. या प्रदूषणामुळे वातावरणात कार्बनडाय ऑक्साईड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे वृक्षापासून वातावरणात सोडल्या जाणार्या प्राणवायुची कार्यक्षमता कमी होते. त्याचे दीर्घ प्रतिकूल परिणाम मानव व प्राण्यांच्या आरोग्यावर होत आहेत.