लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: रमजान महिन्यात ईदच्या दिवशी ईदगाह मैदानावर नमाज अदा क रण्याची परंपरा आहे. मैदानाला अतिक्रमणाचा विळखा पडल्यामुळे तो तातडीने दूर करून मूलभूत सुविधा देण्याची मागणी करीत मनपाचे विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांच्या नेतृत्वात मनपावर असंख्य मुस्लीम बांधवांचा मूक मोर्चा धडकला होता. या बाबीची प्रशासनाने गंभीरतेने दखल घेत गुरुवारी ईदगाह मैदान तसेच भांडपुरा चौकातील मनपा उर्दू शाळा परिसर व पोळा चौकातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान सुरू असून, ईदच्या दिवशी हरिहरपेठस्थित मोर्णा नदीच्या काठावरील ईदगाह मैदानावर नमाज अदा केली जाते. रमजान महिन्यातील ईदचा दिवस वगळल्यास या मैदानाच्या देखभालीसाठी महापालिका प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे याठिकाणी वर्षभर मोकाट गुरांचा मुक्तसंचार राहतो. स्थानिक रहिवाशांनी मैदानालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले. मैदानाच्या देखभालीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करीत १४ जून रोजी मनपाचे विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांच्या नेतृत्वात मुस्लीम बांधवांनी मनपावर मूक मोर्चा काढून निवेदन सादर केले होते. निवेदनाची तातडीने दखल घेत प्रशासनाने ईदगाह मैदान परिसर तसेच पोळा चौकातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढण्याची कारवाई पार पडली. यावेळी क्षेत्रीय अधिकारी दिलीप जाधव, अतिक्रमण विभागातील अब्दूल रशीद, काशीब पटेल, साहिल देशमुख तसेच आरोग्य निरक्षक उपस्थित होते. भांडपुरा चौकातील अतिक्रमणाला अभय!भांडपुरा चौकात महापालिकेच्या उर्दू शाळेच्या आवारभिंतीलगत नागरिकांनी अतिक्रमण थाटले आहे. मुख्य नाल्यावर लाकडांची विक्री केली जात असल्यामुळे नाल्याची साफसफाई करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाचे संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहते. संबंधित झोन अधिकारी, आरोग्य निरीक्षकांसह अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना भांडपुरा चौकातील अतिक्रमण दिसत नाही का,असा सवाल उपस्थित होतो. या अतिक्रमणाला मनपाचे अभय असल्याची चर्चा या ठिकाणी सुरू होती.
ईदगाह मैदानालगतचे अतिक्रमण हटविले!
By admin | Updated: June 16, 2017 02:14 IST