अकोला : ऐन दिवाळीत शहरातील काही भागात अचानक विद्युत दाब वाढत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या घरातील लाखो रुपयांची उपकरणे निकामी होत आहे. परिणामी ग्राहक त्रस्त झाले आहेत, तर महावितरण तांत्रिक कारण पुढे करीत आहे. महावितरणच्या चुकीमुळे जर घरातील विद्युत उपकरणे जळाली, तर नुकसानभरपाई देण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.बुधवारी जुने शहरातील डाबकी रोड परिसर तसेच गुरुवारी सायंकाळी हरिहर पेठ पाण्याच्या टाकीजवळील घरांमध्ये अचानक विद्युत दाब वाढल्याने नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाली. अनेक नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, ट्युबलाईटसह घरातील महागडी उपकरणे जळाली. कोणताही दोष नसल्यामुळे केवळ महावितरणच्या चुकीमुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे नागरिकांच्या घरातील लाखोंचे नुकसान झाले आहे. विद्युत दाबामुळे अचानक उपकरणं निकामी झाल्याने काही वेळ काय झाले, हेच अनेकांना समजले नाही. या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले असून, नुकसान भरपाईची मागणी केली आहे. आपल्या घरातील विद्युत तारा व उपकरणांची माहिती स्वत:ला असायला हवी. घरातील वितळणतार (फ्युज) योग्य अम्पीअरची असायला हवी. ती योग्य जाडीची असली तर विद्युत दाब वाढताच तार वितळते व घरातील विद्युत पुरवठा बंद होतो. नागरिकांना मात्र फ्युज जाण्याचा राग येतो. ग्राहकांनी घरातील विद्युत सर्किटबाबत पूर्ण माहिती करून घ्यायला हवी. केवळ वायरमनवर अवलंबून राहू नये, असे अखिल भारतीय ग्राहक संघटनचे अध्यक्ष जयप्रकाश पाटील मुरूमकार यांनी सांगीतले. * वेळेत तक्रार दिल्यास मिळू शकते भरपाई घरातील उपकरणांचे विद्युत दाब वाढल्याने नुकसान झाले तर ग्राहकांनी त्वरित त्याची महावितरणकडे तक्रार करायला हवी. त्यानंतर इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर घरातील उपकरणांची तपासणी करून अहवाल सादर करतो. त्यामागील नेमकी कारणे काय, याचा शोध घेतो. ग्राहकांच्या घरातील विद्युत उपकरणांचे विद्युत दाब वाढल्यामुळे नुकसान झाल्याचे सिद्ध झाले तर महावितरणकडून नुकसानभरपाई मिळू शकते, असे महावितरणने स्पष्ट केले. नागरिकांचीही जबाबदारी असून, त्यांनी घरातील अर्थिंंग लिकेज सर्किट ब्रेकर बसवायला हवे, असे आवाहन महावितरणने केले.
विद्युत दाब वाढला; उपकरणे जळाली
By admin | Updated: October 25, 2014 01:06 IST