अकोला: जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत मंगळवारी शिक्षण विभागाचे वाभाडे निघाले. दोन उर्दू शिक्षकांनी दिलेल्या आत्मदहनाचा इशारा सभेत चांगलाच गाजला. निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने आत्मदहनाच्या इशार्याबाबत मला काहीही देणे-घेणे नसल्याचे सांगून शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याने सभेत चांगलाच गोंधळ उडाला. जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा मंगळवारी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या विषय पत्रिकेवर विषयांचा दुष्काळ असला तरी सदस्यांनी विविध विभागांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांनी सभा चांगलीच गाजली. वाडेगाव येथील घरकुल योजना, टाकळी येथील सरपंचाने पदावर असताना घेतलेला घरकुला योजनेचा लाभ या प्रश्नांसोबतच शिक्षण विभागाच्या कारभारावर सदस्यांनी अधिकार्यांना कोंडीत पकडले. विशेषत: शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत सदस्यांनी शिक्षणाधिकार्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांना देता आली नाही. २0१२ पासून दोन उर्दू शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न गाजत आहे. या प्रश्नावर चौकशी समिती गठित करण्यात आली होती. समितीने आपला अहवालही सादर केला आहे. या अहवालावर काय कारवाई केली, याबाबत चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर शिक्षणाधिकार्यांनी अहवालच बघितला नसल्याचे सभागृहाला सांगितले. विशेष म्हणजे, एकीकडे अहवाल बघितला नसल्याचे सांगून शिक्षणाधिकार्यांनी दुसरीकडे उर्दू शिक्षकांच्या आत्मदहनाच्या इशार्यानंतर शिक्षण संचालकांकडे मार्गदर्शन मागितल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांनी याबाबत मला काहीही घेणे देणे नाही, मला याबाबत निर्णय घेता येणार नाही, असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. समायोजनाबाबतही त्यांना उत्तर देता आले नाही. जिल्ह्यात ५५ शिक्षक अतिरिक्त असतानाही मूर्तिजापूरमध्ये आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकाला नियुक्त करून घेण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पांडे गुरुजींनी केली. याशिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सभेत गाजला.
शिक्षणाधिकारी म्हणतात, मला घेणे-देणे नाही!
By admin | Updated: November 19, 2014 02:03 IST