मूर्तिजापूर - तालुक्यातील पिकांची स्थिती चिंताजनक असून, ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकरी कुटुंबावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. पेरणी आटोपल्यानंतर काही पिके जमिनीच्या वर आलीत; परंतु पावसाने दगा दिल्याने शेतकरी धास्तावला आहे. या परिस्थितीचा परिणाम म्हणून बाजार ओस पडला असून, महागाई नियंत्रणाबाहेर गेली आहे. रक्षाबंधन व नागपंचमी या सणावर दुष्काळाचे सावट होते; आता हीच स्थिती आगामी सणाच्यावेळी होणार आहे. पोळा सण हा शेतकर्यांचा महत्त्वाचा सण आहे; परंतु बैलाची सजावट करण्याचीसुद्धा शेतकर्यांची मानसिकता उरली नाही. वर्षभर शेतकर्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे शेतकरी व बैल यांच्यासाठी हा सण महत्त्वाचा असतो. या सणासाठी शेतकरी बैलासाठी घुंगरू , रेशमी गाठी, रंगित झुला, मोरकी, वेसण, बाशिंग, गोंडे व कवडी यांची खरेदी करतात. या वस्तूंच्या किमती वाढल्याने बळीराजा आता चिंतेत पडला आहे. महागाईमध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे शेतकर्यांचे बजेट कोलमडले आहे. सोयाबीन, पर्हाटी, तूर ही पिके पाण्याअभावी जळण्याच्या स्थितीत आहेत. पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहे. काही ठिकाणी पाणी देण्याचे प्रकार सुरू आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी, सिरसो, दहातोंडा, जामठी, माना व कुरू म या पट्ट्यातील पिके पाण्याअभावी सुकली आहेत.
सणासुदीवर दुष्काळाचे सावट
By admin | Updated: August 21, 2014 00:45 IST