अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी महिलांची मंगळवारी प्रचंड गर्दी झाली होती. ३00 रुग्णांची क्षमता असलेल्या स्त्री रुग्णालयात तब्बल ४५६ रुग्णांना दाखल करण्यात आले. त्यामुळे काही गर्भवती महिलांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीसाठी पाठविले; मात्र वैद्यकीय महाविद्यालयात आलेल्या या महिलांना आल्या पावलीच परत पाठविण्यात आले. याचा त्रास गर्भवती महिलांना सहन करावा लागला. क्षमतेपेक्षा अधिक महिला प्रसूतीसाठी स्त्री रुग्णालयामध्ये दाखल झाल्याने प्रशासनाची दमछाक झाली, तर वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने त्यांच्या जिवाशी खेळ केल्याचे दिसून आले.जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये अद्ययावत वॉर्ड तयार करण्यात आले असून, नवजात बालक आणि गर्भवती महिलांसाठी हायटेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी येणार्या महिलांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून, अकोला जिल्हय़ासोबतच वाशिम जिल्हय़ातील बहुतांश ठिकाणावरील गर्भवती महिला जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल होत आहेत. क्षमतेपेक्षा अधिक महिला प्रसूतीसाठी दाखल होत असल्याने डॉक्टरांवरील ताण वाढला असून, याचा प्रत्यय मंगळवारी आला. क्षमतेपेक्षा १५६ जास्त महिला प्रसूतीसाठी दाखल झाल्याने प्रशासनाची भांबेरी उडाली. स्त्री रुग्णालय प्रशासनाने काही महिलांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी पाठविले; मात्र वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने या गर्भवती महिलांना दाखल न करताच परत पाठविले. त्यामुळे या गर्भवती महिलांची दिवसभर पायपीट सुरू होती. अखेर स्त्री रुग्णालय प्रशासनाने यावर तोडगा काढीत या महिलांना आवारात तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून त्यांच्यावर उपचार केले. यामुळे मंगळवारी स्त्री रुग्णालयाला यात्रेचे स्वरूप आले होते.
जिल्हा स्त्री रुग्णालय ‘हाऊसफुल’
By admin | Updated: August 20, 2014 00:21 IST