तेल्हारा : पावसाचा जोर कमी झाल्याने उन्हाची दाहकता वाढली आहे. शेतकऱ्यांनी आंतर मशागतीच्या कामांना वेग दिला असून, फवारणीचे कामे सुरू आहेत. वातावरणातील बदलांमुळे तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. तालुक्यातील शेतशिवारात मूग, उडीद, सोयाबीन पिकांवर रोगराईने थैमान घातले असून, कपाशीची फूल-पाती गळ सुरू झाली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
यंदा खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. त्यानंतर पावसाने दडी दिल्याने शेतकरी चिंतित सापडला होता. पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली. सद्यस्थितीत पिके बहरली आहेत. वातावरणात बदल झाल्याने खरीप हंगामातील मूग, उडीद पिकावर रोगराई पसरल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील मनात्री, तळेगाव, मनब्दा, दापुरा या खारपाणपट्ट्यात रोगराई वाढल्याने शेतकरी फवारणी करीत असल्याचे चित्र आहे. महागडे कीटकनाशकांच्या फवारणीनंतरही रोगांवर नियंत्रण मिळत नसल्याने कृषी विभागाने बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.
------------------------
मूग, उडीद या पिकांवर रोगराई वाढली असून, पिकांची नासाडी होत आहे. हाताशी आलेले पीक निघून जात असल्याने चिंता वाढली आहे. याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे.
- गजानन थोरात, शेतकरी मनात्री बु.
---------------
सध्या उडीद पिकावर मारुका अळी व मावा किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे, शेतकऱ्यांनी दोन्ही किडीचे व्यवस्थापनासाठी विद्यापीठाचे शिफारशीप्रमाणे मोनॉक्रोटोफोस १० मिली १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा
------------------
कपाशीची होतेय पाती गळ
तालुक्यात कपाशीचा पेरा वाढला असून, सद्यस्थितीत पिके बहरली आहे. मात्र वातावरण बदलाचा फटका कपाशीला बसला असून, बहरलेल्या कपशीची पाते-फूल गळ होत असल्याचे दिसून येत आहे. पावसाचे प्रमाण जास्त व उन्हाची तीव्रता अधिक असल्याने अनेक पिकांना याचा फटका बसत असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.