लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या विशेष दुरुस्तीसह नव्या कामांमध्ये असलेले मोठे घोळही पंचायत राज समितीच्या भेटीदरम्यान चांगलेच गाजणार आहेत. त्यामध्ये कासारखेड, राहित, कोयाळ, पिंपळशेंडा, पारस-२, बिडगाव येथील कामांच्या घोळाची चर्चा आहे. सोबतच घुंगशी मुंगशी गावतलाव आणि तामशी येथील साठवण तलावातील गंभीर प्रकारही चर्चेत येण्याची शक्यता आहे. चार बंधाऱ्यांच्या कामातील अनियमितता यापूर्वीच पुढे आली आहे. त्यावर आता पंचायत राज समितीपुढेही लघुसिंचन विभागाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामध्ये राहित कोयाळ बंधाऱ्याच्या कामासाठी वापरलेल्या गौणखनिजाची रक्कम कंत्राटदार आर.जी. सोनोने यांच्याकडून वसुली सुरू असल्याची माहिती आहे. तर पिंपळशेंडा बंधाऱ्यासाठी गौणखनिज स्वामित्वधनाच्या पावत्या नसताना ३०,४०० ही रक्कम वसूल केली नाही. पंचायत राज समितीच्या धसक्याने कंत्राटदार पी.एन. पुरोहित यांच्याकडून वसुलीची कारवाई सुरू करण्यात आली. पारस बंधाऱ्याला तांत्रिक मंजुरीआधीच ३४ लाखांचे देयकविशेष म्हणजे, कोल्हापुरी बंधारा पारस-१ ला मूळ तांत्रिक मंजुरी १२,४१,७८५ एवढीच होती. त्या बंधाऱ्यासाठी २७ आॅक्टोबर २००८ रोजी ४८ लाख ४३ हजार ४०० रुपये खर्चाला लघुपाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी मंजुरी दिली. त्याआधीच म्हणजे, ३१ मार्च २००८ रोजीच या बंधाऱ्याच्या चौथ्या देयकासाठी ३४ लाख ७४ हजार रुपये देण्याचा चमत्कार घडला. सोबतच पिंपळशेंडा बंधाऱ्याचे काम देताना कंत्राटदार पुरोहित यांच्या कंत्राटदार नोंदणी प्रमाणपत्राची मुदत संपलेली असताना कामाचे आदेश दिल्याचा मुद्दाही गाजण्याची शक्यता आहे.
कासारखेडसह अनेक बंधाऱ्यांच्या घोळाचीही चर्चा
By admin | Updated: May 30, 2017 02:09 IST