लोकमत न्यूज नेटवर्कलोहारा : येथील मन नदी पात्रात तयार झालेल्या दरडमधून रेतीचे अवैध उत्खनन सुरू असताना दरड कोसळल्याने एक मजूर ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. नदी पात्रात ३० ते ३२ फुटांपर्यंत खड्डे खोदलेले असून, याकडे महसूल विभाग डोळेझाक करीत असल्याने हा अपघात घडला. लोहारा परिसरातील दरड कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. लोहारा परिसरातील मन नदीसह सर्व नदी-नाल्यांमधून रेतीचे अवैध उत्खनन दररोज सुरू आहे. रात्रंदिवस रेतीचा अवैध उपसा सुरू असून, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने रेती चोरट्यांची हिंमत वाढली आहे. परिसरातील अनेक रेती घाटांवरून विना रॉयल्टीची किंवा एकाच रॉयल्टीवर दिवसभर रेतीची वाहतूक सुरू असते. यामध्ये रविवारी शेगाव आणि बाळापूर तालुक्याच्या हद्दीवरील लोहारा शिवारातील मन नदीच्या पात्रालगतच्या राम अवतारसिंह सिंघेल यांच्या मालकीचा गट नं ८०१ या शेताच्या मन नदी काठावरील भागात भूभाग खोदून रेती काढण्याच्या प्रयत्नात दरड कोसळुन गोकूळ कैलास नराळे (२५) रा. मानेगाव हा मजूर ठार झाला, तर विजय तेजराव चौधरी, (३०) रा. मानेगाव हा गंभीर जखमी झाला. नदी पात्रात अवैध उत्खननाने तयार झालेल्या दरडमध्ये रविवारी दुपारी वाहन क्रमांक एमएच २८ - ७७१६ मध्ये रेती भरण्यात येत असताना दरड कोसळली व त्याखाली मजूर दबले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ गाठून दबलेल्या मजुरांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत गोकुळ कैलास नराळे हा मजूर गतप्राण झाला होता, तर विजय तेजराव चौधरी याला गंभीर अवस्थेत शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, परिस्थिती नाजूक असल्याने प्रथमोपचारानंतर त्याला अकोला येथे हलविण्यात आले. तहसीलदारांवर गुन्हा दाखल करा! - तेल्हारा तालुक्यातील घोडेगाव येथे अवैध खनिजाचे उत्खनन करताना तीन मजूर दरड कोसळून मरण पावले होते. या प्रकरणी तेल्हाऱ्याचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. - या अपघातातील घटनास्थळ हे बाळापूर तालुक्यात येत असून, येथील तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या दुर्लक्षितपणामुळेच ही घटना घडल्याने त्यांच्या विरुद्धही कारवाई व्हावी आणि मृतक आणि गंभीर जखमी मजुराच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.अहोरात्र वाहतूक : महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष बाळापूर तालुक्यात वाहणाऱ्या मन नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत असून, अहोरात्र होणाऱ्या वाहतुकीने या परिसरातील रस्तेही उखडले आहेत. सर्व प्रकार बिनबोभाटपणे सुरू असताना महसूल प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.--
रेती घाटातील दरड कोसळली; एक ठार
By admin | Updated: May 29, 2017 01:50 IST