लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेकडे विविध योजना आणि लेखाशीर्षाचा शिल्लक कोट्यवधींचा निधी मुदती ठेवीत गुंतवण्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडून चार ते पाच महिन्यांचा विलंब झाल्याने त्यातून उत्पन्नात भर पडण्याऐवजी नुकसान झाले आहे. त्यातच अधिक व्याजदर देणाऱ्या बँकेऐवजी इतर बँकांतही तो ठेवल्याने त्यातूनही नुकसान झाले आहे. याप्र्रकरणी २०१० ते आतापर्यंत झालेल्या नुकसानाची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी तक्रारकर्ते तुषार देशमुख यांनी ग्रामविकास मंत्र्यांसह संबंधितांकडे केली आहे. जिल्हा परिषदेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवलेल्या रकमेची मुदत १९ आणि २१ फेब्रुवारी २०१५ रोजी संपली. ती रक्कम पुनर्गुंतवणूक केल्यास त्यावर ९.२० टक्के व्याजदर देण्याचे पत्रही बँकेने त्याचवेळी जिल्हा परिषदेला दिले. जिल्हा परिषदेची १०१ कोटी ७८ लाख २३२३२ रुपये ही रक्कम तब्बल चार महिन्यांनंतर म्हणजे जुलै २०१५ मध्ये गुंतवण्यात आली. त्यामुळे या काळात जिल्हा परिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्याचवेळी या रकमेवर सर्वाधिक व्याजदर देण्याचे पत्र जिल्हा बँकेने दिले होते; मात्र त्यातील काही रक्कम महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक, युको बँकेत ठेवण्यात आली. या बँकांचा व्याजदर जिल्हा बँकेपेक्षा १.५० ते २ टक्के कमी आहे. तरीही रक्कम गुंतवण्यात आली. त्यातूनही जिल्हा परिषदेचे लाखोंचे नुकसान झाले. त्यानंतर १५ जुलै २०१६ रोजी जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागाने १२० कोटी ४५ लाख ६६०६७ रुपये जिल्हा बँकेत १८२ दिवसांच्या मुदतीवर ठेवली. ती मुदत १६ जानेवारी २०१७ रोजी संपुष्टात आली. त्यातून व्याजापोटी जिल्हा परिषदेला किती रक्कम मिळाली, याची माहितीही वित्त विभागाने दिली नाही. त्यातच १६ एप्रिल २०१७ पर्यंतही या रकमेच्या गुंतवणुकीबाबतची प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे होत असलेल्या विलंबाने जिल्हा परिषदेचे लाखो रुपये व्याजाचे नुकसान होत आहे. माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रांतून हा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी जबाबदार असलेल्यांची चौकशी करून कारवाईची मागणीही देशमुख यांनी सर्व संबंधितांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.
निधी गुंतवणुकीसाठी विलंब; जि.प.चे लाखोचे नुकसान
By admin | Updated: May 29, 2017 01:47 IST