अकोला : सोने-चांदीचे दागिने खरेदी करताना एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या व्यवहारासाठी पॅनकार्ड आवश्यक करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या अर्थ व वित्त विभागाने तशा स्वरूपाचे पत्र जारी केले. यादरम्यान सोने, चांदी खरेदी-विक्रीचा सर्वाधिक व्यवहार प्रामुख्याने शेतकरी वर्ग करीत असला तरी शेतातील उत्पादनाच्या अनिश्चिततेमुळे शेतकर्यांकडे पॅनकार्ड उपलब्ध नाहीत. यामुळे शेतकर्यांसह सराफा व्यावसायिकांची चांगलीच कुचंबणा झाली आहे. शिवाय पॅनकार्ड नसेल तरीही पळवाटा असल्याने शासनाचा हा निर्णय अव्यवहार्य असल्याचे मत गुरुवारी ह्यलोकमतह्णने आयोजित केलेल्या परिचर्चेत उमटले. सोने, चांदीच्या उलाढालीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशातून केंद्र शासनाने एक लाख रुपये किमतीपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केल्यास संबंधिताला पॅनकार्ड आवश्यक करण्यात आले. विदर्भात सोने खरेदी करणे किंवा गहाण ठेवण्याचे सर्वाधिक व्यवहार शेतकरी वर्ग करीत असल्याचा सराफा व्यावसायिकांचा दावा आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणारी शेती व त्याकरिता होणार्या आर्थिक व्यवहारासाठी शेतकरी सोने गहाण ठेवतात. शेती उत्पादन शाश्वत व निश्चित नसल्यामुळे बहुतांश शेतकर्यांकडे पॅन कार्ड उपलब्ध नाहीत. सोने, चांदीचा बाजार शेतकर्यांच्या उलाढालीवर अवलंबून असल्याने सराफा व्यवसायिकांची मात्र कुचंबणा झाल्याचे मत परिचर्चेत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केले. पॅनकार्ड नसेल व सोने खरेदी-विक्रीचा व्यवहार एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा होत असेल तर पॅर्नकार्डला पर्याय म्हणून आयकर विभागाचा ६0 व ६१ क्रमांकाचा अर्ज भरून देणे अत्यावश्यक असण्यावरही परिचर्चेत प्रकाशझोत टाकण्यात आला. ही प्रक्रिया संबंधित ग्राहकासाठी त्रासदायक ठरणार असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. शिवाय एक लाखापेक्षा कमी किमतीचा व्यवहार दाखवण्यासाठी पळवाटांचा वापर होण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. ग्रामीण भागातील शेतकरी शहरातील सराफा व्यावसायिकांकडे सोने गहाण ठेवतात. याबदल्यात त्यांना पैसे मिळत असले तरी ठेव सुरक्षित असल्याची भावना आजही कायम आहे, परंतु शासनाच्या निर्णयांमुळे शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. साहजिकच याचा परिणाम सराफा बाजारावर होणार असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले. परिचर्चेत भाजपच्या किसान सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील, सराफा असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सराफ, सचिव प्रकाश लोढिया, सेवानवृत्त आयकर अधिकारी शालीग्राम वारूळकर, सराफा व्यावसायिक शैलेश खरोटे, राजकुमार वर्मा, शेतकरी राजू पाटील यांनी सहभाग घेतला.
सोने खरेदीसाठी पॅनकार्डचा निर्णय अव्यवहार्य
By admin | Updated: March 20, 2015 01:11 IST