अकाेला : महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष तसेच हप्तेखाेरीमुळे जिल्ह्यात रेतीमाफियांचा हैदाेस सुरू असतानाच पाेलीस अधीक्षकांच्या दहशतवादविराेधी पथकाने बुधवारी नया अंदुरा आणि टाकळी जलंब येथील दाेन ट्रक पकडले. दाेन्ही ट्रकचालकाकडे रेतीची राॅयल्टी नसतानाही खुलेआम वाहतुक सुरू हाेती. बाळापूर तालुक्यातून जिल्हाभर रेतीमाफियांचा हैदाेस सुरू असल्याचे वास्तव आहे.
बाळापूर तालुक्यातील जुना अंदुरा येथील रमेश शंकर वानखेडे हा त्याच्या एम.एच. ३० बीडी ३४२० क्रमांकाच्या ट्रकमधून रेतीची विनाराॅयल्टी तसेच चाेरट्या मार्गाने वाहतूक करीत असल्याची माहिती दहशतवादविराेधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह पाळत ठेऊन वानखेडे याचा ट्रक ताब्यात घेतला. त्याला रेतीची राॅयल्टी मागितली असता काहीही नसल्याचे त्याने सांगताच पाेलिसांनी ट्रक जप्त केला आहे. तर रमेश वानखेडे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर बाळापूर तालुक्यातीलच टाकळी जलंब येथील रहिवासी मंगेश मारोती मुंडे हा त्याच्या एम.एच. ०४ एफजे ००९३ क्रमांकाच्या ट्रकमधून रेतीची विनाराॅयल्टी तसेच चाेरट्या मार्गाने वाहतूक करीत असताना दहशातवादविराेधी पथकाने हा ट्रक ताब्यात घेतला. चालकाची विचारपूस केली असता त्याने राॅयल्टी नसल्याचे सांगताच त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करून त्याचा ट्रक जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दहशतवादविराेधी पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.