अकोला : राष्ट्रीय महामार्गावरील शेगाव टी पॉइंट परिसरात असलेल्या शाकम्बरी इंडस्ट्रिजवर दरोडेखोरांनी १६ ऑगस्ट रोजी १.४५ वाजताच्या सुमारास दरोडा घातला. यावेळी चौकीदाराला मारहाण करून त्याला शौचालयात बंद केले आणि इंडस्ट्रिजमधील ३९ हजार ६00 रुपयांचा ऐवज लंपास केला.जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरी, दरोडा, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.पोलिस गस्त घालत असले तरी गुन्हे कमी होताना नाहीत. यापूर्वी पोलिस अधिकार्यांनी ठाणेदारांना वाढते गुन्हे कमी होण्यासाठी सूचनाही दिल्या. मात्र तरीही गुन्हे कमी होताना दिसत नाही. शाकम्बरी इंडस्ट्रिजचे सुपरवायझर संतोष साहेबराव रामेकर (३६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीदरम्यान चार ते पाच दरोडेखोरांनी इंडस्ट्रिजमध्ये प्रवेश केला. यावेळी इंडस्ट्रिजमध्ये दिनकर प्रल्हाद पागधुने, बाळकृष्ण रावणकर, अनिल ढोले हे कर्मचारी होते. हे तिघे कर्मचारी झोपेत असताना, दरोडेखोरांनी त्यांना उठविले आणि त्यांचे कपडे काढून त्यांना मारहाण केली. नंतर तिघांनाही शौचालयामध्ये बंद करून ठेवले आणि इंडस्ट्रिजमधील चार ते पाच बॅटरी आणि इतर साहित्य लंपास केले. रविवारी सकाळी इंडस्ट्रिजमधील काही कर्मचारी कामावर गेल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी शौचालयातील बंद कर्मचार्यांची मुक्तता केली. संतोष रामेकर यांच्या तक्रारीनुसार डाबकी रोड पोलिसांनी दरोडेखोरांविरुद्ध भादंवि कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल केला.
अकोला येथील शाकम्बरी इंडस्ट्रिजवर दरोडा
By admin | Updated: August 18, 2014 01:44 IST