तेल्हारा: संततधार पावसानंतर नद्यांना आलेल्या पुरामुळे तालुक्यातील गौतमा, पूर्णा व विद्रुपा नदीकाठच्या लोकांना त्याची झळ पोहचली असून, ४ हजार हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा महसूल विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर तालुक्यात दमदार पावसाचे आगमन झाले. संततधार पावसामुळे तालुक्यातील गौतमा, आस, विद्रुपा, पूर्णा या नद्यांसह नाल्यांना पूर आला. त्यामुळे नदीकाठच्या शेतांमधील नवांकुरित पिकांचे मोठे नुकसान झाले. अडगाव, मालठाणा, बेलखेड, पाथर्डी, तेल्हारा बु. , कोठा, भांबेरी, खापरखेड, पिवंदळ, सांगवी, नेर, खेल सटवाजी, खेल कृष्णाजी, दापुरा, उमरी, खाकटा, खेल देशपांडे, उबारखेड, मनात्री खुर्द, मनात्री बु., तळेगाव डौला, तळेगाव पातुर्डा, आडसुळ, बांबर्डा या गावांमधील नदीकाठच्या शेतातील पिके वाहून गेल्याने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मनात्री, मालपुरा व तेल्हारा येथील काही जणांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने घरांची पडझड झाली. तालुक्यातील चार हजार हेक्टर जमिनीवरील कपाशी, सोयाबीन, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला आहे. निंभोरा खुर्द व हिंगणी बु. येथील नदीवरील पूल वाहून गेल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. पीक नुकसानीचा सर्व्हे येत्या दोन दिवसांत होणार आहे. शासनाने नुकसानीची मदत त्वरित जारी करावी, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By admin | Updated: July 29, 2014 20:16 IST