लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: अकोट नगर परिषदेच्या दर्यापूर मार्गावरील कंपोस्ट डेपोला ३० मे रोजी आग लागली. नगर परिषद अग्निशमन दलाने ही आग विझविली. तरी उशिरापर्यंत राख धुमसतच होती. दर्यापूर मार्गावर नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारला आहे. या ठिकाणी लाखो रुपयांच्या मशिनरीची अवस्था भंगारागत झाली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटनही अद्याप झाले नाही. त्यामुळे हा प्रकल्प सुरू होऊ शकला नाही. पर्यायाने या कंपोस्ट डेपोमध्ये शहरातील घाण, कचरा साठवून ठेवला आहे. मंगळवारी दुपारी या कचऱ्याला आग लागली. जोराची हवा सुटल्यामुळे ही आग चांगलीच भडकली होती. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली; मात्र डेपोतील कचरा जळून राहिलेली राख धुमसतच होती. अग्निशमन दलाचे पर्यवेक्षक रुपेश जोगदंड, चालक रमेश सावरकर, सै. इरफान अली, फायर फायटर प्रभाकर आठवले, राजेंद्र वानखडे यांनी ही आग विझविली. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे. या ठिकाणी वारंवार आग लागत आहे. त्यामुळे हा प्रकल्प कार्यान्वित करावा, अशी मागणी होत आहे.
अकोट नगरपालिकेच्या कंपोस्ट डेपोला आग
By admin | Updated: May 31, 2017 02:18 IST