शाळेत प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षण प्रभावी असल्याने दुसऱ्या वर्गापासूनच मुलांना उजळणी मुखोद्गत होऊ लागली. परंतु आता शाळेपासून दुरावलेल्या मुलांना जोडशब्दांचे वाचन करणे कठीण जाऊ लागले आहे. इयत्ता पाचवीच्या मुलांना भागाकार व गुणाकार कसा करायचा, याचा विसर पडला आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात शाळेकडून पाठ्यपुस्तकांचे वाटप झाले. परंतु कोणत्याही विषयाच्या पुस्तकाचे पान उघडून न पाहणाऱ्या मुलांना यंदा कोणते धडे अभ्यासासाठी आहेत, हेसुद्धा माहीत नाही.
वर्गनिहाय विद्यार्थी
पहिली २९,४१०
दुसरी २९,२४८
तिसरी २९,७८०
चौथी ३०,१८५
मुलांना अक्षर ओळख होईना!
दीड वर्षापासून केवळ मोबाईलचा उपयोग करून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. लिहिण्याची सवय नसल्याने विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडत आहेत.
लिहिण्याची गती मंदावली असून, अक्षर ओळखही कठीण झाली आहे. पालकवर्गही लक्ष द्यायला तयार नाही.
पहिली - दुसरीच्या विद्यार्थ्यांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ऑनलाईन शिक्षणाचा फारसा परिणाम दिसत नाही.
पालकांनी घरातच घ्यावी शाळा...
कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईनचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे पालकांनी पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
विद्यार्थ्यांची अक्षर ओळख होण्यासाठी पालकांनी पाल्यांकडून नियमित काही पाने शुद्धलेखनाचा सराव करून घेणे आवश्यक आहे.
केवळ ऑनलाईनच्या भरवशावर न राहता स्वत: पाल्यांच्या दैनंदिन अभ्यासाकडे लक्ष द्यावे, घरातच काळजी घेऊन मूल्यांकन करणेही गरजेचे आहे.
अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक
कोरोना काळात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. मोबाईल आणि टीव्हीच्या सभोवताल त्यांचा दिवस राहतो.
ऑनलाईन शिक्षणात फारसा रस नसल्याने अनेकांचे मन एकाग्र राहात नाही. यामुळे अभ्यास करण्याची इच्छा नसते.
यामुळे चिमुकले अभ्यास टाळण्यासाठी विविध कारणे सांगत आहेत. त्यामुळे पालकांची डोकेदुखी वाढली आहे.
वारंवार सांगूनही अनेकांचे पाल्य ऐकत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याचे विविध परिणामही समोर येत आहेत.
चिमुकल्यांना दैनंदिन अभ्यासाचा विसर पडत चालला आहे. पालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
शाळेमध्ये गेल्यानंतर दिवसभर मुले व्यस्त राहात होती. त्यानंतर घरी अभ्यास व नंतर शिकवणी वर्गात जात होते. मात्र, आता ऑनलाईन शिक्षणामुळे त्यांच्याच हाती मोबाईल असतो. क्लासनंतर मोबाईलमध्ये गेम, कार्टून पाहणे यात जास्त वेळ जात आहे.
- विजय किर्तने
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे हसत - खेळत होणारे शिक्षण बंद झाले. ऑनलाईनमुळे अडचणी वाढल्या आहेत. केवळ मोबाईलच्या भोवती शिक्षण सुरू आहे. त्यामुळे अभ्यासातही मन लागत नसल्याचे दिसून येत आहे.
- सचिन राऊत