मेहकर: बालकुपोषणाच्या निर्मूलनासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना सुरू असल्यातरी कुपोषणाचा आकडा कमी होताना दिसत नाही. पश्चिम वर्हाडात जवळपास ३१ हजार ९२१ बालके कुपोषित असून, ४ हजार ५६४ बालके अतिकुपोषित आढळून आले आहेत. पश्चिम वर्हाडात बाल कुपोषण बळावत असल्याने कुपोषण थोपविण्यात यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे वास्तव समोर येत आहे. बालकांच्या आरोग्यासाठी एकात्मिक महिला बालविकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार वाटप करण्यात येतो. त्याचबरोबर बालकुपोषण रोखण्यासाठी शासनदरबारी कोट्यवधी रुपयांच्या अनेक योजना राबविल्या जातात. अलीकडेच शासनाने ह्यकुपोषण चलेजावह्ण चा नारा दिला आहे. कुपोषण चलेजावच्या माध्यमातून बालकांचा संपूर्ण विकास व्हावा, यासाठी शासनाने 0 ते ५ वर्ष वयोगटातील बलकांना फळे, अंडे, दूध यासह सकस आहार देण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे; मात्र बाल कुपोषण थोपविण्यास ही यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा या आकडेवारीवरून समोर येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात १८ हजार २१४ बालके कुपोषित असून, २ हजार ५१४ बालके अतिकुपोषित आहेत. वाशिम जिल्ह्यात ७ हजार ३९१ बालके कुपोषित असून, १ हजार ७0 बालके अतिकुपोषित आहेत. तसेच अकोला जिल्ह्यात ६ हजार ३१५ बालके कुपोषित असून, ९८0 बालके अतिकुपोषित आहेत. एकूण पश्चिम वर्हाडात ३१ हजार ९२१ कुपोषित बालके व ४ हजार ५६४ बालके अतिकुपोषित आढळल्याने महिला एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बालकांना अंगणवाडीमध्ये पोषण आहार वेळेवर मिळतो की नाही ? बालकांना देण्यात येणारा आहार किती प्रमाणात सकस असतो? बालकांची आरोग्य तपासणी होते की नाही ? असे विविध प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष घालून बालकांच्या आरोग्य तपासण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करावी, अशी मागणी होत आहे.
पश्चिम वर्हाडात बळावतेय बालकुपोषण
By admin | Updated: August 4, 2014 20:47 IST