अकोला-महापुरुषांचा अवमान करणारे आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध अकोल्यात युवा सेनेच्यावतीने करण्यात आला. जेल चौकात रविवारी सकाळी रास्ता रोको करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. फेसबुक आणि व्हॉट्स ॲपसारख्या सोशल मीडियाचा वापर समाजकंटकांनी धार्मिक तणाव निर्माण करण्यासाठी सुरू केला आहे. असाच प्रकार शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आक्षेपार्ह छायाचित्रं अपलोड करणार्यांनी करून बघितला. त्याचे पडसाद रविवारी सकाळपासूनच राज्यभर उमटले. अकोल्यातही युवा सेनेच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. रास्ता रोको करून युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध नोंदवित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आंदोलनकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.
छत्रपतींच्या अवमानाचे अकोल्यात पडसाद
By admin | Updated: June 1, 2014 23:06 IST