अकोला : विभागीय जात पडताळणी समितीमार्फत कंत्राटी पद्धतीने लिपिक आणि सहाय्यक शिपाई या पदांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत अनेक उमेदवारांना परीक्षेसाठी अपात्र ठरविण्यात आल्याची माहिती वेळेवर मिळाल्याने, परीक्षा देण्यासाठी आलेल्या संबंधित उमेदवारांना नाहक हेलपाटे सहन करावे लागले. जात पडताळणी समितीच्या भरती प्रक्रियेत अनागोंदी कारभाराचा प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक २ मार्फत कंत्राटी तत्त्वावर लिपिक-टंकलेखक-डाटा एन्ट्री ऑपरेटर १३ आणि कार्यालयीन सहाय्यक शिपाई ७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. लिपिक-टंकलेखक -डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी १७६ आणि शिपाई पदांसाठी १९३ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले. या पदांसाठी गेल्या २४ मे रोजी घेण्यात येणारी परीक्षा रद्द करून, रविवार, १ मे रोजी अकोल्यातील आरडीजी महिला महाविद्यालय येथे परीक्षा घेण्यात आली; मात्र या परीक्षेसाठी उमेदवारांच्या प्राप्त अर्जांमधून अपात्र ठरलेल्या अर्जांची यादी परीक्षेच्या एक दिवस आधी म्हणजे शनिवारी सायंकाळी विभागीय जात पडताळणी समिती कार्यालयात जाहीर करण्यात आली. त्यामध्ये लिपिक पदांसाठी ५९ आणि शिपाई पदांसाठी ६४ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले. परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना विभागीय जात पडताळणी समितीमार्फत ह्यएसएमएसह्णद्वारे माहिती देण्यात आली; मात्र परीक्षेसाठी अपात्र ठरविण्यात आल्याची माहिती संबंधित उमेदवारांना कळविण्यात आली नाही. परीक्षेसाठी अपात्र ठरविण्यात आल्याची माहिती वेळेवर मिळाल्याने पुणे, जालना व इतर जिल्ह्यातून परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना परीक्षा न देताच परत जावे लागले. त्यामुळे जात पडताळणी समितीच्या भरती प्रक्रियेतील अनागोंदी कारभारामुळे उमेदवारांना नाहक हेलपाटे सहन करावे लागले.
जात पडताळणी समितीच्या भरती प्रक्रियेत अनागोंदी
By admin | Updated: June 2, 2014 01:36 IST