प्रवीण खेते /अकोला : लोकसभा निवडणुकीदरम्यान चर्चेत असलेल्या चहाचेही अच्छे दिन येतील, असा विचारही त्यावेळी कोणी केला नसेल. निवडणुकीच्या प्रचारामध्ये चहाला भाव काय आला तोच गत वर्षभरातच चहाने देखील भाव खाल्ला. राजकारणात चहाने पाऊल काय टाकले, ५ रुपये कटचा चहा आता ७ रुपयांवर येऊन पोहोचला. राजकीय चहाने कट्टय़ावरील चहाप्रेमींमध्ये चालणारी चाय पे चर्चा मात्र महागडी ठरत आहे, हे नक्की. मागील वर्षी देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे चांगलेच वारे वाहू लागले होते. सत्तेच्या राजकारणात राजकीय पक्षांची एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची जणू जुगलबंदीच लागली होती. यात मोदी यांचे नाव पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित होताच त्यांच्या भूतकाळातील अविभाज्य घटक असलेल्या चहाने देखील वर्तमानात पाऊल टाकले. मोदी यांच्या सोबतच निवडणूक प्रचारात उतरलेल्या चहाचा रंग विरोधी पक्षांवरही चढू लागला. त्यामुळे लोकसभा निवडणूक प्रचार हा कुठल्या एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसून सर्वकाही 'चहा'साठीच होत असल्याचे भासू लागले. निवडणुकीनंतर सत्तारुढ झालेल्या मोदी सरकारने चाय पे चर्चा थेट विलायतेत नेली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या व्हाईट हाऊसमधील चर्चेत चहाने महत्त्वाचे स्थान मिळवले. मोदी यांच्या प्रभावासोबतच चहाने देखील आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली. म्हणून कधी नव्हे ते आता घडत असून, जगातल्या प्रत्येक राष्ट्रामध्ये 'चाय पे चर्चा' गाजत आहे. विलायतेत पोहोचलेली चाय पे चर्चा ही नवीन भारतीय संस्कृती आजवरच्या इतिहासात निवडणूक प्रचारातून प्रथमच उदयास आली. मात्र, वर्षभरातच चहाने भाव खायला सुरुवात केली. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी कट्टय़ावर होणारी 'चाय पे चर्चा' महागडी ठरत आहे.
‘चाय पे चर्चा’ महागली
By admin | Updated: April 27, 2015 01:43 IST