अकाेला : बाळापूर तालुक्यातील विविध नदीपात्रातून रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारे तीन ट्रक दहशतवाद विराेधी कक्षाने पकडले. हे तिन्ही ट्रक बाळापूर महसूल विभागाकडे देण्यात आले असून त्यांच्याकडून या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
बाळापूर तालुक्यातून रेतीची अवैधरीत्या वाहतूक व विक्री माेठ्या प्रमाणात सुरू आहे. गत चार दिवसापासून पाेलिसांनी छापेमारी केली. आतापर्यंत दहापेक्षा अधिक ट्रक व ट्रॅक्टर पकडण्यात आले आहेत. मात्र तरीही महसूल विभागाच्या आशीर्वादाने रेतीची अवैध वाहतूक जाेरात सुरुच आहे. अशाच प्रकारे रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारे एम एच २८ बीबी १२९८, एम एच २८ बीबी १०२६, एम एच ३० बीडी ३४९४ हे तीन ट्रक जप्त करण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील एका महसूल अधिकाऱ्यावर चाकू हल्ला झाल्यानंतरही महसूल विभागाने आतापर्यंत एकही कारवाई केली नसल्याचे वास्तव आहे. पाेलिसांकडून कारवाईचा सपाटा सुरु असतानाच महसूल विभाग मात्र मूग गिळून बसल्याने त्यांचे अर्थकारण स्पष्ट हाेत आहे. दहशतवाद विराेधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांनी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या निर्देशावरून कारवाई सुुरू केली आहे. त्यनुसार रविवारी रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारे ट्रक जप्त करण्यात आले आहे. हे ट्रक बाळापूर महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.