बुलडाणा: मुंबई येथील छायाचित्रकार प्रथमेश नांदलस्कर व ङ्म्रेयस लिंबुकर या दोघांनी ओपस फोटोग्राफिया ही कंपनी तयार करून संपूर्ण जिल्हा आपल्या कॅमेरामध्ये चित्रबद्ध केला आहे. या चित्रांचे प्रदर्शन सध्या बुलडाण्याच्या गांधी भवनमध्ये सुरू असून, जिल्हाभरातील ऐतिहासिक स्थळे, पक्षी, प्राणी, इमारती यासोबतच जीवनशैलींचे हे फोटो पाहताना हा आपलाच बुलडाणा असल्याचा अभिमान रसिकांच्या चेहर्यावर झळकतो तर काहींच्या तोंडून अरे ! आपले पाहायचे राहिलेच, असे उत्स्फूर्त उद्गार बाहेर येतात. या दोन्ही छायाचित्रकारांसोबत साधलेला हा संवाद.प्रश्न - तुमचा कलेचा प्रवास कसा सुरू झाला ?- छायाचित्रणाची आवड होतीच. महाविद्यालयात असताना अनेक फोटो काढून ते आम्ही कॅम्पसमध्ये लावत होतो. पुढे छायाचित्रणाचे प्रशिक्षण घेतले व याच क्षेत्रात करिअर करायचे, असे ठरविले. आम्ही दोघांनी थोडा हटके विचार करून ओपस फोटोग्राफिया या नावाने कंपनी रजीस्टर्ड करून आपले काम सुरू केले. प्रश्न - बुलडाणा जिल्हा क्लीक करण्याचा विचार कसा सुचला? - तसं पाहिलं तर हा आमचा पहिलाच प्रयोग आहे. सुजाता कुल्ली यांची एकदा भेट झाली व त्यांनी ज्ञानदान प्रकल्पाविषयी सांगितले. त्यावेळी त्यांनी बुलडाण्यातील ऐतिहासिक वारसा, सौंदर्य याचे भरभरून वर्णन केले. ते वर्णन ऐकून आम्ही भारावून गेलो व हे सर्व सौंदर्य फोटो प्रदर्शनाच्या सहाय्याने मांडले तर ही कल्पना त्यांना सांगितली. त्यांनी तत्काळ संमती दिल्याने आमचा हुरूप वाढला व त्याचे फलीत आज तुमच्या समोर आहे.प्रश्न- किती दिवसात तुम्ही हे छायाचित्रण केले ? - खरोखर अतिशय समृद्ध असा हा जिल्हा आहे. आम्ही पहिल्यांदाच या जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये आलो. त्यापूर्वी पूर्ण माहिती घेतली. सिंदखेडराजा येथून छायाचित्रणाची सुरुवात केली व सर्व तालुके फिरून जवळपास तीन हजारावर फोटो आम्ही काढले आहेत. संपूर्ण महिना यामध्ये गेला, त्यापैकी आता २२0 फोटोचे प्रदर्शन येथे भरविले आहे.प्रश्न - सर्व जिल्हा कव्हर झाला, असे वाटते का ?- नाही ! किमान तीन महिने लागतील एवढी संपदा व सौंदर्य या जिल्ह्यात आहे. पावसाळा खूप असल्यामुळे आम्हाला सातपुडा, अंबाबारवा या परिसरात जाता आले नाही. त्यामुळे ती बाजू या प्रदर्शनात नाही. येथील ठेवा अतिशय समृद्ध आहे, त्याचे जतन झाले पाहिजे, हा वारसा जोपासणे म्हणजे इतिहास जोपासणे आहे.प्रश्न - लोकांचा , छायाचित्रकारांचा प्रतिसाद कसा मिळाला ?- या प्रदर्शनाला येणारे रसिक भरभरून कौतुक करतात. येथील छायाचित्रकारही अतिशय ताकदीचे आहेत. त्यांचाही प्रतिसाद चांगला मिळाला. हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या फोटोचेही हे पहिलेच प्रदर्शन असल्याची माहिती आम्हाला मिळाली.प्रश्न - छायाचित्रण या कलेविषयी काय सांगाल ?- ही साधना आहे. छायाचित्रकाराची नजर ही वेगवेगळी असते. असलेल्या सौंदर्यामधून नेमकेपणा शोधून ती चित्रबद्ध करण्याचे कौशल्य अभ्यासांतीच येते, त्यामुळे प्रत्येक फोटो हा आव्हानच असतो, हवा तो क्षण टिपता आला पाहिजे, त्यासाठी संयम, सहनशीलता व रसिकपणा असलाच पाहिजे.
छायाचित्रणासाठी बुलडाणा समृद्ध
By admin | Updated: November 12, 2014 00:45 IST