लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आदर्श कॉलनीमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक १६ च्या खुल्या मैदानावर अवैधरीत्या शोषखड्डे खोदल्यामुळे यामधील पाण्यात बुडून दोन बालकांचा १४ आॅगस्ट २०१६ रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी शोषखड्डे खोदणारे उदय वझे आणि खंडेलवाल महाविद्यालयाचे संजय देवळे नामक प्राध्यापक या दोघांविरुद्ध खदान पोलिसांनी आरोप निश्चित करून त्यांना सोमवारी अटक केली. त्यानंतर काही वेळातच दोन्ही आरोपींची सुटका केली. मनपा शाळा क्रमांक १६ समोर असलेल्या मैदानात मे महिन्यात रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी शोषखड्डे तयार करण्यात आले होते. खड्डे पूर्णपणे बुजवण्यात आलेले नाही. त्यामुळे पावसाचे पाणी खड्ड्यात साचले. दरम्यान, १४ आॅगस्ट २०१६ रोजी खंडेलवाल लॉन्स परिसरातील वसाहतीमधील रहिवासी सिद्धार्थ राजेश धनगावकर व कृष्णा राकेश बहेल हे दोन चिमुकले खेळत असताना खड्ड्यात पडले. खड्ड्यामध्ये गाळ व इतर बांधकाम साहित्य असल्याने ते यामध्ये फसले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. खड्ड्यामध्ये मुलांचा मृत्यू प्रकरणाची तक्रार मृतक मुलाचे वडील राजेश धनगावकर यांनी खदान पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून १६ आॅगस्ट २०१६ रोजी मुलांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त, संबंधित इंजिनिअर, संबंधित कॉन्ट्रॅक्टर व एनजीओविरुद्ध भादंविचे कलम ३०४ ए ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. यामध्ये गड्डम प्लॉट येथील रहिवासी उदय पांडुरंग वझे आणि आदर्श कॉलनी येथील रहिवासी तथा खंडेलवाल महाविद्यालयाचे प्रा. संजय काशीनाथ देवळे या दोघांचा समावेश करण्यात आला असून, त्यांना सोमवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही आरोपींची खदान पोलिसांनी सुटका केली.गुन्हा सिद्ध झाल्यास दोन वर्षांचा कारावासभारतीय दंड विधानाच्या ३०४ अ कलमानुसार निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवण्याचा आरोप होतो. तो सदोष मनुष्यवध होत नाही; मात्र गुन्हा सिद्ध झाल्यास दोन वर्षे कारावासाची शिक्षा, द्रव्यदंड अगर दोन्हीही शिक्षेची तरतूद आहे.
बालक मृत्यू प्रकरणी दोघांना अटक व सुटका
By admin | Updated: May 30, 2017 01:52 IST