लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष तेजराव थोरात यांनी वरिष्ठांशी विचार विनिमय करून तेल्हारा तालुका भाजपा कार्यकारिणी अध्यक्षासह बरखास्त केली आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यातील पदाधिकारी पक्षाचे काम करीत नसतील, तर त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्याचा इशारा पक्षातर्फे देण्यात आला आहे. अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष तेजराव थोरात यांनी तेल्हारा तालुक्यासंदर्भात अनेक तक्रारींची दखल घेऊन तातडीने संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली असून, लवकरच नवीन कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. काही तालुक्यातील पदाधिकारी पक्षाने दिलेली जबाबदारी योग्यरीत्या पार पडत नसल्याबद्दल तक्रारी येत आहेत. या संदर्भात लवकरच निर्णय घेऊन नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा पक्ष सूत्रांनी दिली आहे.