अकोला : टिळक रोडवरील त्रिवेणेश्वर व्यापारी संकुलात चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या दोन मुख्य आरोपींची सोमवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. टिळक रोडवर त्रिवेणेश्वर व्यापारी संकुलाच्या माळ्यावर गोविंद साखरे याने दहा वर्षांच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवून पाठविले होते. ती मुलगी माळ्यावर जाताच येथे उपस्थित असलेल्या शेख मुस्तकीन कुरेशी अ. जाकीर कुरेशी व मोहसीन कुरेशी मो. अन्वर कुरेशी या दोघांनी तिला पकडून अत्याचार केला होता. चिमुकली रक्ताने माखलेले कपडे अंगाला गुंडाळून प्रचंड भयावह अवस्थेत खाली येत असताना व्यापाऱ्यांना दिसली. उपस्थितांनी तिला पाहताच रामदासपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. गुन्हा दाखल करून पोलिसांनी या सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपी गोविंद साखरे यास अटक केल्यानंतर प्रवीण चव्हाण यालाही पोलिसांनी अटक केली होती; मात्र चव्हाण हा या प्रकरणात आरोपीच नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट करीत या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख मुस्तकीन व मोहसीन कुरेशी या दोघांना अटक केली; त्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांनी वाढ केली आहे, तर याच प्रकरणातील संशयित आरोपी चव्हाणची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
चिमुकलीवरील अत्याचार; आरोपींच्या कोठडीत वाढ
By admin | Updated: April 25, 2017 01:39 IST