अकोला: आकोट फैल येथील रहिवासी मुलीचा वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभागात मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या तिच्या नातेवाईकांनी येथील परिचारिकेस बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या मारहाणीच्या निषेधार्थ परिचारिकांनी रात्री उशिरापासून कामबंद आंदोलन केले; मात्र वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर शनिवारी सकाळी परिचारिकांनी कामबंद आंदोलन मागे घेतले.आकोट फैल येथील रहिवासी प्रियंका विजय पट्टेबहाद्दूर (१५) हिला मागील दोन महिन्यांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये तिच्यावर उपचार सुरू होते; मात्र शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास प्रियंकाची प्रकृती खालावल्याने तिला रात्री ८ वाजता रुग्णालयातीलच अतिदक्षता (आयसीयू) विभागात हलविण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र रात्री उशिरा प्रियंकाचा मृत्यू झाला. प्रियंकाच्या मृत्युमुळे संतप्त झालेल्या तिच्या नातेवाईकांनी येथील डॉक्टरांसह परिचारिकांशी हुज्जत घातली. वाद वाढत असल्याने सुवर्णा सावळे नामक परिचारिकेने येथील सुरक्षा रक्षकास पाचारण केले त्यामुळे आणखीच संतप्त झालेल्या प्रियंकाच्या आजीने परिचारिका सुवर्णा सावळे हिला बेदम मारहाण केली. मारहाण करताना परिचारिकेच्या हाताचे बोट पिरगळल्याने तिचे दोन बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. यासोबतच परिचारिकेवर चप्पलही भिरकावल्याने सवरेपचार रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिचारिकांना विनाकारणच मारहाण होत असल्याने सवरेपचार रुग्णालयातील सर्व परिचारिकांनी शुक्रवारी मध्यरात्रीच कामबंद आंदोलन सुरू केले. शनिवारी सकाळी महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनच्या परिचारिका व सवरेपचार रुग्णालयातील परिचारिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांच्या कार्यालयात धाव घेऊन वॉर्डासमोर सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी केली.सोबतच परिचारिकांना मारहाण करणार्यांवर कठोर कारवाई करून यापुढे सुरक्षा देण्याची मागणी केली. मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा अधिष्ठात्यांना देण्यात आला मात्र अधिष्ठात्यांनी आश्वासन दिल्यानंतर परिचारिकांनी आपले कामबंद आंदोलन मागे घेतले.
अकोला वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकेस बेदम मारहाण
By admin | Updated: July 20, 2014 02:00 IST