अकोला: विधानसभा निवडणुकीत माळी समाजातील प्रबळ दावेदारांना उमेदवारी मिळावी, यासाठी महाराष्ट्र माळी समाज महासंघ प्रमुख राजकीय पक्षांना भेटणार असल्याची माहिती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मानकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यासाठी प्रदेश कार्यकारिणीची निवडही अकोल्यातच करण्यात आली. राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनाही निवडणुकीच्या रिंगणात अप्रत्यक्षपणे उतरण्याच्या तयारीत आहेत. या पृष्ठभूमीवर माळी महासंघाची निवडणुकीतील भूमिका, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मानकर यांनी अकोल्यात स्पष्ट केली. विधानसभा निवडणुकांमध्ये माळी समाजातील प्रबळ दावेदारांना उमेदवारी मिळण्यासाठी माळी महासंघाचे शिष्टमंडळ भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस यासारख्या प्रमुख पक्षांना भेटणार आहे. यासाठी महासंघाची उपसमिती संभाव्य उमेदवारांकडून त्यांची माहिती मागविणार आहे. समाजातील मतांचे विभाजन होणार नाही, याचीही काळजी घेण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष मानकर आणि माजी आमदार तथा कार्याध्यक्ष वसंतराव मालधुरे यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार जगन्नाथ ढोणे यांच्यासह महासंघाचे राज्यभरातील निवडक पदाधिकारी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत माळी समाजाला हवे प्रतिनिधित्व
By admin | Updated: July 25, 2014 00:50 IST