अकाेला : वाशिम बायपास परिसरात राजकीय पाठबळाचा वापर करीत गजानन कांबळे व त्याच्या साथीदारांनी हैदाेस सुरू केला असून याच गुंडगिरीच्या बळावर किरकाेळ वादातून अवैध वसुली करण्याच्या कारणावरून एका ट्रान्सपाेर्टच्या संचालकास बेदम मारहाण करीत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी जुने शहर पाेलिसांनी गजानन कांबळेसह सात जणांविरुध्द दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. या परिसरात गत अनेक दिवसांपासून खुलेआम गुंडगिरी सुरू असल्याने पाेलिसांचा वचक संपल्याचे दिसून येत असून अकाेला पाेलिसांची इभ्रत गुंडांनी पुन्हा एकदा रस्त्यावर टांगल्याचे वास्तव आहे.
हिंगणा येथे शेख वाहेद माे. याकूब यांचे इंडिया ट्रान्सपाेर्ट नावाचे प्रतिष्ठान आहे. हे प्रतिष्ठान बंद करून ते रविवारी त्यांचा मुलगा शेख हुजैफा शेख वाहेद याच्यासाेबत दुचाकीने परत घराकडे येत असतांना आरीफ कांचवाला यांच्या दुकानासमाेर दुचाकीचा धक्का लागल्यावरून त्यांच्याशी काही जणांनी वाद घातला. यावेळी त्यांनी गजानन कांबळे, लाल्या व हिरा पानटपरीवाला या तिघांसह त्यांचे अनाेळखी चार साथीदारांना समजावण्याचा प्रयत्न केला असता गजानन कांबळे याने शेख वाहेद माे. याकूब यांच्या खिशातील २० हजार रुपयांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. तसेच कांबळे याने त्याच्या साथीदारांना शेख वाहेद माे. याकूब यांना मारण्याचा इशारा केला. यावरून कांबळेच्या साथीदारांनी शेख वाहेद माे. याकूब यांना बेदम मारहाण करीत त्यांच्या डाेक्यावर लाेखंडी पाईपने हल्ला चढविला. यामध्ये शेख वाहेद माे. याकूब हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने सर्वाेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मुलाने या प्रकरणाची माहिती जुने शहर पाेलिसांना दिली. पाेलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले व पंचनामा केला. या प्रकरणी शेख माेहम्मद माे. याकूब यांच्यावतीने पाेलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी यांनी जुने शहर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पाेलिसांनी रिपाइंचा गजानन कांबळे, लाल्या, हीरा पानटपरीवाला व त्याच्या अनाेळखी चार साथीदारांविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३२७, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये मारहाण व दंगलीचे गुन्हे दाखल केले.
पाेलिसांचा वचक संपला, मीनांनी लक्ष देण्याची गरज
वाशिम बायपास परिसरात राजकीय पाठबळाचा वापर करीत गुंडगिरी प्रचंड वाढली आहे. मात्र तरीही पाेलिसांकडून या गुंडांवर कारवाई हाेत नसल्याचे वास्तव आहे. गुंडांचा हैदाेस खुलेआम सुरू असताना पाेलिसांनी मात्र अद्याप अशा गुंडांवर तडिपारीची कारवाई केली नाही. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक व अकाेल्याचे तत्कालीन पाेलीस अधीक्षक चंद्रकिशाेर मीना यांनीच आता याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मीना अकाेल्यात असताना हे गुंड भूमिगत झाले हाेते. मात्र आता पाेलिसांचा वचकच नसल्याने ते पाेलिसांसमाेर खंडणी वसूल करणे व मारहाण करण्याची घटना खुलेआम करीत असल्याची चर्चा आहे.