अकोला, दि. २२: येथील त्रिमती कलादालनात झालेले ह्यकलाविष्कार-२0१६ह्ण हे प्रदर्शन सृजनशिलतेचे वैभव ठरले आहे. तब्बल ७५ कलाकारांच्या १५४ कलाकृती या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या, त्यापैकी १८ चित्रकृती या परदेशामध्ये जाणार असल्याने अकोल्यातील हे प्रदर्शन कलावंतांसह कलाक्षेत्रासाठी ऊर्जादायी ठरले आहे. जगप्रसिद्ध कलावंत सतीश पिंपळे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या कलाविष्कार सोहळय़ाला ज्येष्ठ शल्य चिकित्सक डॉ.नानासाहेब चौधरी, प्रशांत देशमुख, अमेरिकेत वास्तव्याला असलेले विजय आळशी, प्राचार्य डॉ.सुभाष भडांगे, प्राचार्य गजानन बोबडे आदी उपस्थित होते. सतीश पिंपळे यांनी व्यक्तीचित्राचे प्रात्यक्षिक सादर करून या प्रदर्शनाची सुरुवात केली . या प्रदर्शनात ७५ चित्रकारांनी सहभाग नोंदवित १५४ कलाकृती प्रदर्शित केल्या, तसेच २ शिल्पकृतीही ठेवण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनातून १८ चित्रकारांच्या २0 कलाकृती एकाच संग्रहाकाने विकत घेऊन मानाचा तुरा रोवला असून, यामधील १२ चित्रकृती परदेशात जाणार आहेत. यावेळी बोलताना पिंपळे यांनी चित्रकला विश्व संभ्रमावस्थेत असल्याचे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. या कलेचा जीवनाच्या कोणकोणत्या पातळीवर उपयोग होतो, हे विषद करीत असतानाच पिंपळे यांनी या क्षेत्राचे महत्त्व अधोरेखीत केले. पुस्तकांच्या लायब्ररीप्रमाणेच विदेशांमध्ये चित्रांचीही लायब्ररी असते, हे सांगुन त्यांनी अकोल्यातील चित्रकला विश्व हे समृद्ध असल्याचा अभिमान व्यक्त केला. या प्रदर्शनासाठी खास अमेरिकेतून आलेले विजय आळशी यांनी भारत हे कलेचे माहेर घर आहे, त्याचा येणार्या पिढीने विसर पडू देऊ नये, असे सांगितले. या प्रदर्शनाचा समारोप खामगावचे कलावंत संजय गुल्हाने यांनी काढलेल्या व्यक्तीचित्राने झाला.
‘कलाविष्कार’ प्रदर्शन ठरले सृजनशिलतेचे वैभव!
By admin | Updated: August 23, 2016 01:01 IST