लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या शेगाव नगरीचे संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन शुक्रवार २ जून रोजी २ दिवसांच्या मुक्कामाकरिता होत आहे. गत ४१ वर्षापासून येथील श्री गजानन महाराज शेगाव पालखी उत्सव समितीच्या वतीने या पालखीचे स्वागत व नगरवासीयांना शिस्तद्धपणे व शांततेत दर्शन घडवून देण्याची किमया यशस्वीपणे पार पाडीत आहे. हे सर्वांना माहितीच आहे.यावर्षीही ही परंपरा पुढे नेत श्रींच्या पालखीचे स्वागत अधिक जोमात व हर्षोल्हासात व्हावे म्हणून समितीच्या वतीने जय्यत तयारी सुरू केली आहे. २ जून रोजी सकाळी श्रींची पालखी महानगरात दाखल होत असून, जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात पालखीच्या पहिल्या दिवसाचा सकाळी तात्पुरता मुक्काम राहील. जेथे पालखीसह आलेल्या वारकऱ्यांची चहा-फराळाची व्यवस्था करण्यात येईल. तसेच श्रींच्या भक्तांना दर्शनाकरिता ही पालखी सकाळी ९ वाजेपर्यंत उपलब्ध राहील. तेथून पालखी पुढील मार्गक्रमणाकरिता निघेल. गोडबोले प्लॉट, डाबकी रोड मार्गे, संत ज्ञानेश्वर मंदिर, कस्तुरबा हॉस्पिटलच्या मागून, शिवचरण मंदिर मार्गे, विठ्ठल मंदिर काळा मारोती रोड, लोखंडी पुलावरून, टिळक रोड, अकोट स्टॅन्ड, दीपक चौक, कलालच्या चाळीसमोरून, जुना वाशिम स्टॅन्ड, चांदेकर चौक मार्ग, पंचायत समिती रोड, कालंका माता बाजोरिया विद्यालय येथे मुक्काम राहील. येथे भक्तांना रात्री सहपरिवार दर्शनाचा व शेगावचा धर्तीवर प्रसादाचा लाभ घेता येईल. नंतर, भजन, कीर्तन व श्री गजानन महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येथे दाखविण्यात येईल. श्रींच्या पालखीचा दुसऱ्या दिवशी मार्ग शनिवारी सकाळी ६ वाजता मुंगीलाल बाजोरिया विद्यालयातून पुढील मार्गक्रमणाकरिता मोठे पोस्ट आॅफिस, नवीन बस स्टॅन्ड, टॉवर चौक, एलआयसी आॅफिस मार्गे, रतनलाल प्लॉट चौक, सिव्हिल लाइन चौक, आकाशवाणी समोरून नेहरू पार्क, गोरक्षण रोड, जुने इन्कमटॅक्स चौक, हिंदू ज्ञानपीठ, आदर्श कॉलनी, संभाजी नगर, डॉ. संतोष शेवाळे यांच्या बंगल्यासमोरून श्री गजानन महाराज मंदिर, बोबळे दूध डेअरीसमोरून सिंधी कॅम्प रोड, अशोक वाटिका चौक, मेन हॉस्पिटलसमोरून सरकारी बगीचा, खोलेश्वर, सिटी कोतवाली, मोठ्या पुलावरून जयहिंद चौक, श्री राजराजेश्वर मंदिरासमोरून हरिहरपेठस्थित श्री शिवाजी टाऊन शाळेत ‘श्रीं’च्या पालखीचा दुसऱ्या दिवशीचा मुक्काम राहील. येथे भक्तांना ‘श्रीं’च्या दर्शनाचा लाभ घेण्यात येईल. शुक्रवार-शनिवार २ व ३ जून रोजी ‘श्री’ची पालखी अकोल्यात राहणार आहे
‘श्रीं’च्या पालखीचे शुक्रवारी आगमन
By admin | Updated: May 30, 2017 01:53 IST