अकोला : शहरातील गुन्हेगारांकडून बिल्डरांना खंडणी मागितल्याच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. या पृष्ठभूमीवर शनिवारी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी शहरातील बिल्डरांची पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीमध्ये बिल्डरांनी शहरातील अनेक छोटे-मोठे गुंड जीवे मारण्याच्या, बांधकाम बंद पाडण्याच्या धमक्या देऊन लाखो रुपयांची खंडणी मागतात. खंडणी न दिल्यास प्रसंगी बिल्डरांना मारहाण केल्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. त्यामुळे बिल्डरांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शस्त्र परवाने देण्याची मागणी केली. शनिवारी क्रेडाई संघटनेच्या सदस्यांनी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी पोलिस अधीक्षकांनी, शहरातील खंडणीबहाद्दरांचा बंदोबस्त करण्यात येऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि बिल्डरासोबतच नागरिकांचीसुद्धा गुंड, खंडणीखोरांच्या दहशतीतून मुक्तता करण्यात येणार आहे. न्यू तापडियानगर, जवाहरनगर भागात पोलिस चौकी सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासंबंधी पोलिस विभागाने नियोजन केले असल्याची माहिती दिली. तसेच बिल्डरांना शस्त्र परवान्यांचा विषयसुद्धा विचाराधीन असल्याचेही ते म्हणाले. बैठकीला अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, शहर पोलिस उपअधीक्षक अमरसिंह जाधव यांच्यासह बिल्डर मनोजसिंह बिसेन, दिलीप चौधरी, आनंद बांगड, अमरीश पारेख, मोहम्मद फाजील, दिनेश ढगे, जितेंद्र पातूरकर, संतोष अग्रवाल, नितीन हिरूळकर, रवी ठाकरे, सिमरन नागरा, कपिल रावदेव, सुरेश कासट, नितीन लहरिया, अभय बिजवे, मनीष बिसेन, सचिन कोकाटे, मनोज सुरेखा, रामप्रकाश मिश्र आदी उपस्थित होते.
बिल्डरांनी मागितले शस्त्र परवाने
By admin | Updated: July 20, 2014 02:01 IST