ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २८ - शेतक-यांचा शेतमाल हमीदरापेक्षा कमी दराने विकला जाऊ नये म्हणून शासनाने राज्यात नाफेड व पणन महासंघाला कपाशी खरेदीची परवानगी दिली आहे. हमीदरासह शेतक-यांना बोनसही जाहीर केला आहे. प्रत्येक शेतक-याला हा बोनस मिळावा, यासाठीचे आपले प्रयत्न असतील, अशी ग्वाही कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय वसंत कृषी प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी शेती व शासनामार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. सद्यस्थितीत शेतमालाचे दर हा मुद्दा गाजत आहे. या अनुषंगाने त्यांना छेडले असता त्यांनी शासनाने हमीदराने शेतमाल खरेदी केंद्र सुरू केल्याचे सांगितले. पण, शासनाने तूर, सोयाबीन आदी पिकांवर हमीदरासह बोनस जाहीर केले आहे. परंतु, बाजारात शेतमाल मुलगा विकण्यास येतो, त्यामुळे माल विकल्याची पावती मुलाच्या नावाने दिली जाते. पण, सातबारा आई -वडिलांच्या नावे असतो. बोनस हे सातबारा बघूनच दिले जाते. आतापर्यंत असे शेकडो व्यवहार झाले आहेत. तसेच शेकडो शेतकºयांनी वेअर हाऊसमध्ये शेतमाल ठेवून त्यावर ७५ टक्के अग्रीम राशी उचलली आहे, असे शेतकरी या बोनसपासून वंचित राहणार असल्याचा मुद्दा उपस्थित केला असता त्यांनी एकही शेतकरी बोनसपासून वंचित राहणार नाही, असे आमचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. सध्या तुरीला ४२५, तर सोयाबीनला २०० रुपये बोनस शासनाने जाहीर केले आहे, हे विशेष.