अकोला: बुधवारी झालेल्या संततधार पावसानंतर गुरुवारी मात्र पावसाने उघाड दिली. २४ जुलैपर्यंत जिल्हय़ात वार्षिक सरासरीच्या ४0 टक्के २८४.६२ मिमी पाऊस झाला. दोन दिवसाच्या झडीनंतर पावसाने उघाड दिल्यामुळे ग्रामीण भागात शेतकर्यांनी गुरुवारी मोठय़ा प्रमाणात पेरण्या केल्या. एकाच दिवशी सर्वच शेतकरी पेरणी करीत असल्यामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली होती. मंगळवार व बुधवारी दोन दिवसात अकोला जिल्हय़ात १३९ मिमी पाऊस झाला. जिल्हय़ाची पावसाची सरासरी ६९७.३ मिमी असून, आतापर्यंत २८४.६२ मिमी पाऊस झाला आहे. जिल्हय़ात यावर्षी जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. १00 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याची सूचना कृषी विद्यापीठ व कृषी खात्याने केली होती. २२ जुलैपर्यंत जिल्हय़ात सरासरी ४0 मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे पेरण्या रखडल्या होत्या. गत दोन दिवसात १३९ मिमी पाऊस झाल्याने शेतकर्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.
** ५0 च्यावर जनावरांचा मृत्यू
जिल्हय़ातील शिवणी, शिवर, कुंभारी, सिसा, मासा, उदेगाव या गावातील ५0 च्या वर जनांवरांचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आहे. तर सुमारे ५0 जनावरांची प्रकृती गंभीर आहे. मंगळवार व बुधवारी दोन दिवस जिल्हय़ात संततधार पाऊस झाला. त्यामुळे पशू गोठय़ात किंवा एकाच ठिकाणी होते. या जनांवरांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. जनावरांना दोन दिवस चारा मिळाला नाही. जनावरे पावसामुळे बाहेर चरण्यासाठी जाऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पशुचिकित्सकांनी व्यक्त केला आहे. अवस्थ जनावरांवर उपचार करण्यात येत आहे. या जनांवरांचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध घेण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नीलेश डेहनकर यांनी केली आहे.
** काटेपूर्णाची पातळी वाढली एक टक्क्याने
गत दोन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्हय़ातील धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा प्रकल्पात १९.३६ दलघमी एवढा जलसाठा आहे. याची टक्केवारी २२.४२ टक्के आहे. दोन दिवसांपूर्वी २१.६८ टक्के जलसाठा होता. पातूर तालुक्यातील मोर्णा धरणात १२.७५ दलघमी ३0. ७४ टक्के जलसाठा आहे. निगरुणा प्रकल्पात ६.३१ दलघमी २१.८७ टक्के जलसाठा आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्पात १.१0 दलघमी ९.४३ टक्के जलसाठा आहे. तर दगडपारवा प्रकल्पात अजूनही मृत जलसाठा आहे.