अकोला: मंगळवार व बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्हय़ात शेकडो गुरांचा मृत्यू झाला आहे. गुरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नसून, अनेक गुरांची प्रकृती अत्यवस्थ आहे. अकोला शहरालगतच्या सिसा-मासा, शिवणी, शिवर, कुंभारी तसेच बोरगाव मंजू, बाभूळगाव या गावांमधील शेकडो गुरांचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी उघडकीस आले. गुरुवारी या गावांमधील ५0 च्यावर गुरांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी यामध्ये वाढ होऊन ही संख्या दीडशेवर पोहोचली आहे. तसेच अनेक गुरांची प्रकृती अत्यवस्थ असून, त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज आहे. यावर्षी पावसाला उशीर झाल्यामुळे नवीन हिरवा चारा उगवलाच नाही. अशातच पशुपालकांजवळील चारा संपला. त्यामुळे चार्याअभावी आधीच जनावरांची प्रकृती क्षीण झाली होती. त्यातच दोन दिवस आलेल्या संततधार पावसामुळे जनावरे चरायला जाऊ शकली नाहीत. थंडीही वाढल्यामुळे गुरांचा मृत्यू होत आहे. जनावरांच्या मृत्यूमुळे पशुपालक संकटात सापडले असून, त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. पशुपालकांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पशुपालकांकडून करण्यात येत आहे. अनेक जनावरांचा मृत्यू झाला असून, त्याची माहितीही शासनाकडे मिळत नाही. पशुपालक स्वत:च मृत जनावरांची विल्हेवाट लावत आहेत. *जनावरांचे शवविच्छेदनच नाही सिसा-मासा भागात मृत पावलेल्या २५ ते ३0 जनावरां चे शवविच्छेदन करण्यात आले नाही. या जनावरांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या शरीरावरील कातडी सोलून नेण्यात आली. त्यामुळे महसूल विभागाने जनावरांच्या मृत्यूची नोंद घेऊन अहवाल सादर केला; मात्र गुरांची ओळख पटणार नसल्यामुळे शवविच्छेदन केले नाही. त्यामुळे पशुपालकांना नुकसानभरपाई मिळणार नसून, त्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे.
अकोला जिल्ह्यात गुरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले
By admin | Updated: July 27, 2014 23:03 IST