अकोला: अकोला क्रिकेट क्लबच्यावतीने आयोजित उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचा समारोप बुधवारी बाळापूरचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. १५ एप्रिलपासून शिबिराला प्रारंभ झाला होता. खडसे यांच्या हस्ते शिबिर यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या शिबिरार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून क्लबचे उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, आॅडिटर दिलीप खत्री, कर्णधार भरत डिक्कर, देवकुमार मुधोळकर, परिमल कांबळे, अमित माणिकराव उपस्थित होते. प्रास्ताविक भरत डिक्कर यांनी केले. खडसे यांनी आपल्या भाषणात, जोपर्यंत मुलांना मूलभूत सोयी व चांगले वातावरण उपलब्ध होत नाही, तोपर्यंत त्यांच्या खेळाला वाव मिळत नाही. शिबिरातून तयार झालेले नवोदित खेळाडू निश्चितच भारताच्या चमूचे प्रतिनिधीत्व करतील. प्रत्येक खेळाडूंनी आत्मविश्वासाने सराव केल्यास निश्चितच स्वप्न साकारायला वेळ लागणार नाही. उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याकरिता खेळासोबतच अभ्यासही करणे आवश्यक असल्याचे शिबिरार्थींना सांगितले. याप्रसंगी खडसे यांच्या हस्ते प्रशिक्षक देवकुमार मुधोळकर, सुमेद डोंगरे, बंटी क्षीरसागर, सुगत गवई, नवल चौधरी, अभिजित मोरेकर, अभिजित करणे, नीलेश लखाडे, धीरज जाधव, अमित कुलट यांचा सत्कार करण्यात आला. तसेच व्हीसीए शिबिरात परिमल कांबळे यांनी प्रशिक्षक म्हणून काम केल्याबद्दल व अमित माणिकराव बीसीसीआयचे व्हिडिओ अन्यालिस्ट म्हणून काम करीत असल्यामुळे दोघांचा विशेष सत्कार करण्यात आला.(क्रीडा प्रतिनिधी)
अकोला क्रिकेट क्लबच्या प्रशिक्षण शिबिराचा समारोप
By admin | Updated: June 1, 2017 14:41 IST