लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यादवराव नावकार हत्याकांडामध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेला फरार आरोपी अजय गालट असल्याच्या संशयावरून पोलिसांनी दुसऱ्याच व्यक्तीस ताब्यात घेतले. एका पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या खबरवरून ही कारवाई करण्यात आली; परंतु ताब्यात घेतलेला व्यक्ती अजय गालट नसून, दुसराच असल्याचे लक्षात आल्यावर त्याला सोडून देण्यात आले. ही घटना बुधवारी सायंकाळी खदान पोलीस ठाण्यात घडली. यादवराव नावकार यांची अजय गालट आणि त्याचा साथीदार मोटघरे यांनी शेती हडप करून परस्पर विकली. नंतर यादवराव नावकार यांची जिल्ह्याबाहेरील जंगलात नेऊन हत्या केली आणि त्यांचा मृतदेह जाळून टाकला होता; परंतु मोटघरे आणि गालट यांच्यात वाद झाल्याने नावकार हत्याकांडाचे बिंग फुटले. पोलिसांनी गुन्हा गालट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची हत्याकांडातील खटल्यातील सुनावणीसाठी शासनाने नियुक्ती केली होती. जिल्हा न्यायालयाने गालट याला फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर गालट याने या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले; परंतु त्यानंतरही गालट याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयानेही जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. तेव्हापासून गालट हा फरार आहे. तो बुधवारी दुपारी अकोल्यात कारमध्ये फिरत असल्याचे एका पोलीस कर्मचाऱ्याला दिसून आले. त्याने ही सूचना पोलिसांना दिली होतीा. अजय गालटला पाहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बोलाविल्यावर त्याने हा अजय गालट नसल्याचे सांगत, त्याच्या चेहऱ्याशी थोडेसे साम्य असलेला दुसराच व्यक्ती असल्याचे सांगितले.
फरार अजय गालटच्या संशयावरून दुसराच ताब्यात!
By admin | Updated: June 1, 2017 01:28 IST