लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : मालवाहु वाहनातून अकोला येथून पातूर मार्गे बार्शीटाक ळी येथे जात असलेला गुटखा पातूर पोलिसांनी मंगळवारी जप्त केला. पोलिसांनी यावेळी ४ लाख ७० हजारांच्या गुटख्यासह ७ लाख ७० हजारांचा ऐवज जप्त केला. अकोला येथून लाखो रुपयांचा नजर गुटखा पातूर मार्गे बार्शीटाकळीकडे जात असल्याची गुप्त माहिती पातूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आगीखेड मार्गावर बोलेरो पिकअप व्हॅन एमएच ३० एव्ही ००३४ या गाडीचा पाठलाग केला, तसेच आगीखेड मार्गावरील जुने ताराचंद इण्डेन गॅसचे गोडाउनजवळ गाडी अडविली. चालकाला विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता, नजर गुटख्याची १० पोते एकूण किंमत ४ लाख ७० हजार रुपये व बोलेरो पिकअप व्हॅन किंमत ३ लाख रुपये असा एकूण ७ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला, तसेच याप्रकरणी गुटखा मालक रामा लक्ष्मण शेवाळे रा. कौलखेड अकोला, चालक ज्ञानेश्वर मारोती पोहरे, रा. कौलखेड अकोला या दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई एपीआय प्रकाश झोडगे यांच्यासह हे.काँ. सोहेल खान, आसिफ खान, अमर खंडारे, सदानंद व्यवहारे यांनी केली. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हे दाखल करण्यात आले नव्हते. सदरच्या कारवाईमुळे शहरातील गुटखा माफियांमध्ये धास्ती भरली असून, गुटखा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच पकडण्यात आला आहे. पुढील कारवाई पातूर पोलीस करीत आहेत.
४.७० लाखांचा गुटखा जप्त
By admin | Updated: May 31, 2017 01:53 IST