अकोला - प्री-मॅट्रिक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेमध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी केवळ चार दिवसांचा कालावधी बाकी असून, अद्याप जिल्हयातील २५ ते ३0 हजार विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली नसल्याची माहिती आहे. जिल्हय़ातील एकूण ९५ हजार विद्यार्थ्यांपैकी १६ ऑगस्टपर्यंत सुमारे ६५ हजार विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यात आले आहेत. प्री-मॅट्रिक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेची १६ ऑगस्टपूर्वी प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक सोनवने यांनी गटशिक्षणाधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले होते. त्यानुसार जिल्हय़ातील ९५ हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे ६५ हजार विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यात आले असून, अद्याप २५ ते ३0 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर होण्याचे बाकी आहेत.
प्री-मॅट्रिक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेबाबत १६ ऑगस्टपूर्वी युजरनेम एसएल शाळेचा युडाएस व पासवर्डसह इतर माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे ऑनलाईन सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या कालावधीत अर्ज सादर केले नसल्याने ही मुदत २२ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली असून, आता चार दिवसांच्या कालावधीमध्ये जिल्हय़ातील सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांंना ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहेत. सदर माहिती शिक्षणाधिकारी यांच्या खात्यावर सादर करून त्याची प्रिंट कॉपी घेतल्यानंतर ती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्री-मॅट्रिक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेकडे मुख्याध्यापकांनी गतवर्षी टाळाटाळ केल्याने तब्बल ४0 हजारांवर विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करण्यात आले नव्हते. त्यामुळे यामधील २0 हजारांवर विद्यार्थ्यांंना अल्पसंख्याक शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागले होते. त्यामुळे या सत्रात एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक सोनवने यांनी ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी मुख्याध्यापकांना आदेश देऊन शिष्यवृत्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.