लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच गैरकायदेशीर हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात येत्या १५ दिवसांमध्ये तब्बल १४५ सीसी कॅमेरे लोकसहभागातून लावण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सुरू केला आहे. शहरात सद्यस्थितीत १७७ सीसी कॅमेरे कार्यरत असून, यामध्ये आणखी भर टाकण्यासाठी आपल्या शहरासाठी एक सीसी कॅमेरा या उपक्रमांतर्गत हे नवीन कॅमेरे लावण्यात येणार आहेत.येणाऱ्या काळात धार्मिक सन उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार आहेत. या काळात मुख्य बाजारपेठेत मोठी गर्दी होते. त्यामुळे दागिने पळविणाऱ्या चोरट्यांसह प्रत्येक घडामोडीवर वॉच ठेवण्यासाठी घरासमोर, प्रतिष्ठान, कार्यालय, अपार्टमेंट, बाजारपेठ या ठिकाणी एक सीसी कॅमेरा लावण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. याच लोकसहभागातून नवीन होलसेल किराणा मार्केट बाळापूर नाका येथे १० सीसी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यासोबतच प्रमुख व्यापारी संस्था, सामाजिक संस्था, होलसेल किराणा बाजार, कपडा बाजार, कोठडी बाजार, सराफा व्यापारी, पेट्रोल पंपचालक आणि स्वेच्छेने पुढाकार घेणाऱ्या व्यापारी, सामाजिक संस्था यांच्या मदतीने शहरात १४५ सीसी कॅमेरे येत्या १५ दिवसांत लावण्यात येणार आहेत. गतवर्षी रमजान महिन्यात ५६ सीसी कॅमेरे मुख्य बाजारपेठेत लावण्यात आले होते. शहरातील प्रत्येक मुख्य रस्त्यावर आणि आतील रस्त्यांवर सीसी कॅमेरे लावण्यासाठी व्यापारी व नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. याव्यतिरिक्त शहरात आणखी सीसी कॅमेऱ्यांची गरज भासल्यास जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून सीसी कॅमेरे लावण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
लोकसहभागातून १४५ सीसी कॅमेरे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2017 01:08 IST