पारनेर : पंचायत समिती सदस्याने केंद्रप्रमुख यांना हाताशी धरून मुख्याध्यापकांची बेकायदा बैठक बोलावणे, शालेय गणवेश खरेदीची ऑर्डर घेणे याबाबींची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून चौकशी होणार आहे. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
पारनेर पंचायत समितीच्या एका सदस्याने शिक्षण विभागातील केंद्र प्रमुख यांना हाताशी धरून मुख्याध्यापकांची बेकायदा बैठक बोलावून स्वतः सांगेल त्या दुकानात गणवेश खरेदीची ऑर्डर देण्यासाठी दबाव आणला होता. या दबावास शिक्षक नेते रा. या. औटी, प्रवीण ठुबे, लक्ष्मण चेमटे, संभाजी औटी, सूर्यकांत काळे, सुनील दुधाडे, जयप्रकाश साठे, शिवाजी पठारे, बाबासाहेब धरम, संतोष खामकर, शिवाजी काकडे, संजय रेपाळे, शिवाजी शिंदे, पंचशील साळवे यांच्या शिक्षक समन्वय समितीने कडाडून विरोध केला होता.
‘लोकमत’ने याबाबतची वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी गुलाब सय्यद यांनी गंभीर दखल घेऊन याची चौकशी करणार असल्याचे सांगितले. यामुळे आता ते केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. पंचायत समिती सभापती गणेश शेळके, गटविकास अधिकारी किशोर माने यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.
----
मोफत शालेय गणवेश खरेदी करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला आहेत. पारनेर तालुक्यात मोफत गणवेश खरेदी बाबतच्या तक्रारींची चौकशी करण्यात येणार आहे.
-गुलाब सय्यद,
प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, नगर
----
शिरूरहून खरेदीचा हट्ट कशासाठी
पारनेर तालुक्यात नऊ हजार विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश मिळणार आहेत. यामुळे पारनेर तालुक्यातील स्थानिक दुकानदार यांच्याकडून गणवेश खरेदी करणे विद्यार्थ्यांना सोपे असताना शिरूर येथील दुकानातून खरेदीचा हट्ट कशासाठी धरला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.