राष्ट्रीय युवा दिन विशेष
श्रीरामपूर : नगरपालिकेत गेल्या पाच वर्षांपासून सफाई कर्मचारी म्हणून कंत्राटतत्त्वावर काम करतो. या कामाची कोणतीही वेतन निश्चिती नाही. सन्मानजनक वेतन तर दूर मात्र किमान वेतनही मिळत नाही. नवीन कपडे खरेदी करतानाही अनेकदा विचार करावा लागतो, अशी कैफियत राहुल दाभाडे या युवकाने ‘लोकमत’कडे मांडली.
पोलादी नसा आणि लोहाचे स्नायू असलेले युवक देशात मोठे सामाजिक परिवर्तन घडवून आणतील या भावनेतून युवा दिन साजरा केला जातो. त्याकरिता स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनाची निवड करण्यात आली. मात्र युवकांचा देश म्हणून गणना केल्या जाणाऱ्या आपल्या समाजात बहुतांशी उच्च शिक्षित युवक हे कंत्राटी पद्धतीने मानधन तत्त्वावर काम करत आहेत. चरितार्थ चालविताना खडतर आयुष्य जगणाऱ्या राहुलसारख्या काही युवकांशी ‘लोकमत’ने युवा दिनानिमित्त संवाद साधला.
पदवीधर असलेला राहुल हा शहर सफाईचे काम करतो. वयाची ३२ वर्षे त्याने पूर्ण केली आहेत. कुटुंबामध्ये आई, आजी, पत्नी व दोन मुले. कामाची कोणतीही लाज तो बाळगत नाही. मात्र या कामामध्ये किमान वेतन (प्रति दिन १७६) मिळेल याची शाश्वती नाही. अनेकदा सुट्यांचे पैसे पदरात पडत नाहीत. त्यामुळे घर खर्चाला पैसे अपुरे पडतात. पत्नीही रोजंदारीवर काम करते. शिक्षण आणि आरोग्यासाठी पैशांची बचत करता येत नाही. पर्यायाने खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घ्यावे लागतात, असे राहुल म्हणाला.
माझा कष्टावर मोठा विश्वास आहे. मात्र पैशांचे मार्ग शोधताना अनेक तरुण वाळू तस्करी व इतर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कामांकडे वळतात, असे धक्कादायक वास्तव त्याने कथन केले.
समग्र शिक्षण अभियानामध्ये काम करणाऱ्या पंकज रंधे याचीही अशीच व्यथा. सन २०१२ ते २०१६पर्यंत त्याने संगणक शिक्षक म्हणून अभियानात काम केले. एमसीएची (मास्टर्स इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) पदवी मिळविली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तत्काळ गावाजवळ नोकरी मिळाली म्हणून मोठ्या अपेक्षेने ती स्वीकारली. केंद्र व राज्य सरकारने योजना दीर्घकाळ चालविण्याचे त्यावेळी आश्वासन दिले. मात्र संपूर्ण पाच वर्षे साडेपाच हजार रुपये वेतनावर काम केल्यानंतर अचानक योजना गुंडाळण्यात आली. आता शासनाच्या कोणत्याही योजनेवर विश्वास नाही. युवकांनी शासनाच्या कंत्राटी नोकऱ्या पत्करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असा सल्ला रंधे इतरांना देतो.
----------------
सरकारने युवकांच्या ज्ञानाचा उपयोग रचनात्मक कामांसाठी करायला हवा. मात्र त्यांना तो वापर करून घेता येत नाही. आरोग्य मिशन, समग्र शिक्षण, उमेद यांसारख्या अनेक शासकीय योजनांमध्ये काम करणाऱ्या युवकांच्या कष्टांवर काही ठेकेदार गब्बर होत आहेत.
-जीवन सुरुडे, सर्व श्रमिक संघ, सरचिटणीस
-----------