अळकुटी : पिंपळगाव जोगे कालव्याच्या आवर्तनात जुन्नर व पारनेर तालुक्यात पाणीवाटप करताना भेदभाव का केला जातो? असा सवाल अळकुटी, रांधे, पाबळ (ता.पारनेर) परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. लवकरात लवकर पाणी न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
१० फेब्रुवारीला पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी सुटले होते. त्यानंतर अळकुटी, रांधे, पाडळी आळे, लोणी मावळा, पाबळ गावांना अतिशय कमी प्रमाणात पाणी मिळाले. त्यातच पाटबंधारे विभागाने अळकुटी गावाला आर्वतन न देता जुन्नर परिसरात आर्वतन सुरू केले. अळकुटी परिसरातील पाझर तलाव क्रमांक एक, दोन यावर पाणीपुरवठा अवलंबून आहेत. त्यातच पाणी सोडले नाही. त्यामुळे पाणीप्रश्न बिकट बनसला आहे. ग्रामपंचायतीने याबाबत १० मार्चला पाटबंधारे विभागाशी पत्र व्यवहारही केला. मात्र त्यावर काही कार्यवाही झाली नाही. पाणी न मिळाल्यास २३ मार्चला नारायणगाव (ता.जुन्नर) येथील कुकडी पाटबंधारे कार्यालयात बेमुदत उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबत अळकुटी येथे २१ मार्चला सकाळी ९ वा. बैठक घेण्यात येणार आहे.
---
अळकुटी परिसरातील शेतकऱ्यांनी लाखो रूपये खर्च करून पाइपलाइन, शेततळी केले. त्यांना पाटपाणी घेता आले नाही, तर फळबागधारक, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येतील. शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही तर तीव्र आंदोलन छेडू.
-रोहिणी काटे,
सदस्य, पंचायत समिती
---
२० पिंपळगाव जोगे
अळकुटी परिसरातील पिंपळगाव जोगे कालवा.